पुणे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उचलले मोठे पाऊल, अजित पवार यांच्यासंदर्भात थेट…
pune ajit pawar and chandrakant patil news : पुणे जिल्ह्याला दोन पालकमंत्री आहेत की काय? असा प्रश्न निर्माण होण्यासारखी परिस्थिती आहे. पुणे जिल्ह्यात सुरु असलेल्या दोन 'दादां'मधील वादाचा इफेक्ट आता होत आहे.
अभिजित पोते, पुणे | 29 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत शिवसेना-भाजपशी घरोबा केला. त्यानंतर राज्यातील राजकारणात अनेक बदल झाले. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. त्यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हवे आहे. परंतु भारतीय जनता पक्षालाही पुण्याचे पालकमंत्री पद आपल्याकडेच हवे आहे. यावरुन विद्यामान पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यात सुप्त संघर्ष सुरु झाला आहे. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी ठोस भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी काय केले
पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये कॉल्ड वॉर सध्या सुरु असल्याच्या बातम्या येत आहेत. पुण्यात मे महिन्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक (डीपीडीसी) झाली होती. या बैठकीत ४०० कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी दिली होती. शरद पवार या बैठकीला उपस्थित होते. परंतु तीन महिन्यांनंतरही अर्थखात्याकडून त्याला अद्याप मंजुरी नाही. अजित पवार राज्याच्या सत्तेत सहभागी होण्यापूर्वी जिल्हा नियोजन समितीची ही बैठक झाली होती. यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे.
बैठकीचे इतिवृत्त तयार पण
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्त १ जुलै रोजी तयार झाले आहे. त्यानंतर ते प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठवले होते. मात्र, २ जुलै रोजी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर इतिवृत्त मंजुरीअभावी रखडले आहे. अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील कोल्डवॉरचा हा परिणाम असल्याची चर्चा आहे.
दोन्ही नेते एकत्र पण…
पुणे शहर आणि जिल्ह्यातील गणेश मंडळांची बैठक २८ ऑगस्ट रोजी झाली होती. या बैठकीला पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि अजित पवार दोन्ही नेते उपस्थित होते. मात्र दोन्ही नेते माध्यमांसमोर एकत्र आले नाही. अजित पवार माध्यमांसमोर आले. पालकमंत्री असून चंद्रकांत पाटील यांनी बैठकीतील निर्णयांची माहिती देण्याचे टाळले. तसेच पालकमंत्री असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गणेश मंडळांच्या बैठकीला लावलेली उपस्थिती हा विषय चर्चेचा ठरला.