बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळाला पाहिजे…; अजित पवार कुणाला उमेदवारी देणार?
Ajit Pawar on Baramati Vidhansabha Election 2024 : अजित पवार यांनी आज बारामतीत बोलताना मोठं विधान केलं आहे. बारामतीतून आपण लढणार नसल्याचं अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे जाहीर केलं आहे. त्यामुळे आता अजित पवार कुणाला उमेदवारी देतात हे पाहणं महत्वाचं असेल. वाचा सविस्तर....
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीत आहेत. कसब्यात असणाऱ्या ‘राष्ट्रवादी भवन’मध्ये काही नेत्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. यावेळी अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी बोलताना अजित पवारांनी आपण बारामतीतून लढणार नसल्याचे संकेत दिलेत. बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळाला पाहिजे, असं अजित पवार म्हणाले. त्यांच्या या विधानाने उपस्थितांचा भुवया उंचावल्या. जर अजित पवार लढणार नसतील तर ते बारामतीतून कुणाला उमेदवारी देणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यांचे पुत्र जय पवार हे बारामतीतून विधानसभा लढतील, अशी चर्चा आहे. मात्र त्याला दुजोरा मिळालेला नाही.
मी सोडून आमदार मिळाला- अजित पवार
पिकतं तिथं उगवत नाही. बारामतीला माझ्याशिवाय नेतृत्व मिळालं पाहिजे. बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळाला पाहिजे. ९१ ते २०२४च्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा. बघता बघता रस्ता न सांगता रस्ता होतोय. न सांगता पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत. करोडो रुपयाच्या. आता बारामती शहर सोडून साडे सातशे कोटीच्या योजना सुरू आहेत. पूर्वी बारामतीचे रस्ते बघितले आहेत. आताचे बघा. काही राहिले. मान्य करतो. कसे करायचे ते बघू. न मागता मेडिकल कॉलेज मिळतं. अहिल्यादेवीचं नाव मेडिकल कॉलेजला देणार आहोत. आयुर्वेदिक कॉलेज तयार करतो, असं अजित पवार म्हणालेत.
बारामतीच्या विकासावर काय म्हणाले?
रोखठोक बोलणारा म्हणून माझी ओळख आहे. बारामती शहर असो गावं असतील आपण विकास करत आहोत. विकास कामांना प्राधान्य कसं देता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. विकास करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. काही महत्त्वाचे निर्णय घेताना आपण लोकांचं मत घेतो. शेवटी निर्णय मीच घेतो. पण मतं जाणून घेतलं तर निर्णय घेताना फायदा होता. आजही मी निवृत्त अधिकाऱ्यांशी बोलून त्यांचंही मत जाणून घेत असतो, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात फिरत असताना सांगतो. इतरांच्या मुख्यमंत्रिपदाचं काय मला माहीत नाही. पण पाच वेळा उपमुख्यमंत्री होण्याची जी संधी मला मिळाली ती कुणाला मिळाली नाही. गंमतीने सांगायचं तर ते रेकॉर्ड कोणीच मोडू शकणार नाही. गंमतीचा भाग जाऊ द्या. अनेकदा असं घडतं की काही लोक आमच्या भोवती सातत्याने असतात, असंही अजित पवार म्हणाले आहेत.