भाऊ श्रीनिवास पवारांचा अजित पवारांनी घेतला जळजळीत समाचार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भावावर टीका केली आहे. बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना होणार आहे, अजित पवारांचे भाऊ हे सुप्रिया सुळे यांच्याकडून प्रचार करत आहेत. अजित पवार यांनी भावावर जळजळीत टीका केली आहे.
Ajit pawar vs Shriniwas Pawar : बारामतीत सूनेत्रा पवारांच्या विरोधात, अजित पवारांचे भाऊ सुद्धा प्रचार करत आहेत. त्यावरुन अजित पवार आता चांगलेच भडकले आहेत. माझ्या निवडणुकीत न फिरलेली भावंडं आता गरागरा फिरत आहेत. मी तोंड उघडलं तर फिरता येणार नाही, असा इशाराच अजित पवारांनी दिलाय. आपलेच सख्खे भाऊ श्रीनिवास पवारांचा अजित पवारांनी जळजळीत समाचार घेतलाय. माझ्या निवडणुकीत न फिरलेली भावडं आता गरागरा फिरत आहेत.
अजित पवारांची बोचरी टीका
पावसाळ्यातल्या छत्र्यांसारखे उगवलेत अशी बोचरी टीका करतानाच तोंड उघडलं तर फिरता येणार नाही, असा इशारा दादांनी श्रीनिवास पाटलांना दिला आहे. श्रीनिवास पाटील अजित पवारांचे सख्खे भाऊ आहेत. त्यांनी सुप्रिया सुळेंच्या बाजूनं प्रचार सुरु केला आहे. काही दिवसांआधीच त्यांनी अजित पवार नालायक म्हटलं होतं.
पवार कुटुंबामध्ये अजित पवार एकटे पडलेत. त्यावरुन भावांचा समाचार दादांनी घेतला. विजय शिवतारेंचं बंड मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांनी शांत केलं. मात्र त्यांनी अर्ज मागे घेवू नये यासाठी रात्री कोणाकोणाचे फोन आले हे आपल्याला शिवतारेंनी दाखवल्याचंही दादा म्हणाले आहेत.
नणंद विरुद्ध भावजय सामना
बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी थेट लढत आहे. पवार कुटुंबातच नणंद विरुद्ध भावजय असा सामना आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांसाठी बारामतीची लढाई प्रतिष्ठेची झाली आहे. त्यामुळं आता लेकीनंतर सुनेला निवडून द्या, असं आवाहन अजित पवार करत आहेत.
अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या संसदेतल्या भाषणावरुनही पुन्हा टोला लगावला आहे. फक्त भाषणं करुन विकास होत नाही. मीही भाषणात एक नंबर आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.
बारामतीचा सामना जसा सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा झालाय. तसाच हा सामना सुप्रिया विरुद्ध अजित पवार असाही आहे. त्यातच सख्खे आणि चुलतेही सुप्रिया सुळेंच्या बाजूनं झाल्यानं, अजित पवारही आक्रमक झाले आहेत.