Devendra Fadnavis : मोदींनंतर सक्षम नेतृत्वातल्या 2-3 नावांपैकी फडणवीस एक, त्यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी द्या; ब्राह्मण महासंघाचं नड्डांना पत्र
गोविंद कुलकर्णी यांनी भाजपाध्यक्षांना पत्र लिहिले, त्यात म्हटले आहे, की देवेंद्र फडणवीस अत्यंत कुशल राजकीय व्यक्तीमत्व आहे. मागील पाच वर्षांत त्यांनी ते सिद्ध केले. राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी कार्य केले.
पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने (Akhil Bharthiya Brahman Mahasangh) केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र लिहून त्याद्वारे ही मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय राजकारणात देवेंद्र फडणवीस विजयाची घोडदौड कायम ठेवतील, असा ब्राम्हण महासंघाला विश्वास आहे. भाजपा नक्कीच देवेंद्र फडणवीसांच्या नावाची घोषणा करून त्यांचा सन्मान करतील, अशी आशा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी (Govind Kulkarni) यांनी व्यक्त केली आहे. भाजपाने नुकतीच केंद्रीय संसदीय समिती तसेच केंद्रीय निवडणूक समितीची घोषणा केली. यात केंद्रीय निवडणूक समितीत फडणवीसांना स्थान देण्यात आले आहे. या विषयी ब्राह्मण महासंघाने अभिनंदन केले आहे.
‘भाजपाचा योग्य निर्णय’
गोविंद कुलकर्णी यांनी भाजपाध्यक्षांना पत्र लिहिले, त्यात म्हटले आहे, की देवेंद्र फडणवीस अत्यंत कुशल राजकीय व्यक्तीमत्व आहे. मागील पाच वर्षांत त्यांनी ते सिद्ध केले. राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी कार्य केले. देवेंद्र फडणवीस भाजपाचे भविष्य आहे. भाजपाला सक्षम नेतृत्व देणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्यानंतर जी काही दोन-तीन नावे आहेत, त्यात देवेंद्र फडणवीस यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. एक महिन्यापूर्वी त्यांना उपमुख्यमंत्रीपद घेण्यास भाग पाडण्यात आले. त्यामुळे एक पाऊल जरी मागे यावे लागले असले तरी हा प्रारंभ आहे. हा निर्णय भाजपाचा योग्य निर्णय मानला जाऊ शकतो.
काय म्हटले आहे पत्रात?
‘ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रहिताला प्राधान्य’
पुण्यातील ब्राह्मण महासंघ 2009 साली काँग्रेसच्या सुरेश कलमाडी, 2014साली अनिल शिरोळे तर 2019साली गिरीष बापट यांच्या मागे उभा राहिला. परिणाम तुमच्या समोर आहेत. त्यामुळे राष्ट्रीय नेतृत्वासाठी देवेंद्र फडणवीस अत्यंत सुरक्षित आहेत. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नाही. मात्र राष्ट्रहिताला प्राधान्य देते. अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी यांच्यानंतर नेतृत्वाची ही परंपरा देवेंद्र फडणवीस कायम राखतील असा विश्वास वाटतो, असे पत्रात व्यक्त करण्यात आला आहे.