बारामतीत बॅनरबाजी, अजित पवार यांच्या बॅनरवर शरद पवार ऐवजी नवीन चाणक्य
Ajit Pawar and Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी रविवारी बंड पुकारले आहे. त्यानंतर बारामतीमधील बॅनरबाजी सुरु झाली आहे. या बॅनरबाजीत मात्र अजित पवार यांचा फोटो आहे.परंतु शरद पवार यांचा फोटो नाही.
योगेश बोरसे, पुणे : राज्यातील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रविवारी मोठा भूकंप झाला. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यांसोबत गेले. ते उपमुख्यमंत्री मंत्री झाले आहेत. राष्ट्रवादीतील या फुटीनंतर शरद पवार मैदानात उतरले. दोन्ही गट जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी अन् पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यात कोणाला यश मिळणार? हे लवकरच स्पष्ट होणार आहे. परंतु शरद पवार यांच्या बारामतीत अजित पवार यांच्या अभिनंदनाचे बॅनर लागले आहे. त्यावर शरद पवार यांचा फोटो नाही तर दुसरा नवीन चाणक्याचा फोटो आहे.
बारामतीमध्ये बॅनरबाजी
अजित पवार यांच्या शपथविधीनंतर बारामती शहरात जोरदार बॅनर्सबाजी सुरु आहे. बॅनर्सवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चाणक्य म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. अजित पवार यांना शुभेच्छा देणाऱ्या बॅनर्सवर शरद पवार यांचा फोटो नाही. बारामतीमध्ये अजित पवार यांचे बॅनर अन् शरद पवार यांचा फोटो नाही, असे प्रथमच घडत आहे.
कोणी लावले बॅनर
अजित पवार यांचे अभिनंदन करणारे बॅनर भाजप पदाधिकाऱ्यांनी लावले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून अजित पवार यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. भाजप-शिवसेना अन् राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
अजित पवार सक्रीय
अजित पवार सुद्धा आता सक्रीय झाले आहे. त्यांनी राज्यातील सगळ्या जिल्हाध्यक्षांना संपर्क करायला सुरुवात केली आहे. पदाधिकाऱ्यांना आपल्यासोबत येण्याचे आवाहन अजित पवार करत आहेत. अनेक जिल्ह्यात बैठका घेऊन अध्यक्ष आपला निर्णय कळवणार आहे. उद्या बुधवारी होणाऱ्या बैठकीपूर्वी अजित पवार यांच्याकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. अजित पवारही स्वतःच्या संघटना मजबुतीसाठी मैदानात उतरले आहेत.