Mukta Tilak death : चालता-बोलताना धाप, कॅन्सरशी कडवी झुंज, तरीही ‘तेव्हा’ मुक्ता टिळक पक्षासाठी मुंबईत आलेल्या
महाविकास आघाडी आणि भाजपसाठी निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. प्रत्येक मत महत्त्वाचं बनलं होतं. पण अशा परिस्थितीत आमदार मुक्ता टिळक या आजारी असताना मुंबईत मतदानासाठी आल्या होत्या.
पुणे : पुण्यातून एक वाईट बातमी समोर आलीय. पुण्यातील भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झालंय. मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे भाजप पक्षाची वैयक्तिक खूप मोठी हानी झालीय. मुक्ता टिळक यांची भाजप पक्षासोबत असलेली एकनिष्ठता शब्दांत मांडता येणार नाही. पण काही महिन्यांपूर्वी संपूर्ण राज्याने त्यांचं पक्षावर असलेलं प्रेम, पक्षासोबत असलेली निष्ठा आणि पक्षादेश कसा मानावा, हे पाहिलं होतं. त्यामुळे मुक्ता टिळक सारख्या नेत्या आपल्या पक्षात असाव्यात असं प्रत्येक पक्षाला वाटणं साहजिकच आहे.
राज्यात सत्तांतर पार पडण्याआधी विधानपरिषदेची निवडणूक पार पडली होती. ही निवडणूक महाविकास आघाडी आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली होती. प्रत्येक मत महत्त्वाचं बनलं होतं. पण अशा परिस्थितीत आमदार मुक्ता टिळक या रुग्णालयात दाखल होत्या.
विधान परिषदेची निवडणूक ही 20 जुलै 2022 ला पार पडली होती. या निवडणुकीसाठी मुक्ता टिळक या आजारी असतानाही पुण्याहून मुंबईत आल्या होत्या. त्यावेळी त्यांना चालताना धाप लागायची. पण तरीही त्यांनी आधी पक्षादेश महत्त्वाचा मानला होता.
विशेष म्हणजे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुक्ता टिळक यांना प्रकृती बरी नसल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी न येण्याचा सल्ला दिला होता. पण मुक्ता टिळक या मतदानासाठी मुंबईत विधान भवनात जाण्यावर ठाम होत्या.
मुक्ता टिळक विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पुण्याहून निघाल्या तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. विधान परिषदेत सगळ्याच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मग आमचा भाजप पक्ष मागे कसा राहणार? पक्षाने दिलेले आदेश पाळणं हे आमच्या रक्तात भिनलेलं आहे. त्यामुळे मी आज मतदानासाठी जात आहे, अशी प्रतिक्रिया मुक्ता टिळक यांनी दिली होती.
मुक्ता टिळक यांच्या मतदानामुळे भाजपला निश्चितच फायदा झाला होता. अटीतटीच्या निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार निवडून आले होते. विशेष म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुकीआधी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी देखील त्या मुंबईत आल्या होत्या. त्यावेळी पक्षाचा झालेला विजय देवेंद्र फडणवीस यांनी मुक्ता टिळक यांना समर्पित केला होता.