Pune crime : झोपायला विरोध केला म्हणून डोक्यात घातला सिमेंटचा ब्लॉक! भिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पुण्यात तरुणास ठोकल्या बेड्या
अनोळखी भिक्षेकऱ्याने तरुणाला झोपण्यास विरोध केला. तसेच त्यास शिवीगाळही केली. या प्रकारामुळे चिडलेल्या अंगीरने तेथेच पडलेला सिमेंटचा ब्लॉक उचलून भिक्षेकऱ्याच्या डोक्यात घातला. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने भिक्षेकऱ्याचा मृत्यू झाला.
पुणे : झोपण्याच्या वादातून अनोळखी भिक्षेकऱ्याच्या खून (Murder) झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील नाना पेठेत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी (Samarth Police station) एका तरुणाला अटक केली आहे. पदपथावर झोपण्यातून हा वाद झाला होता. यावेळी तरुणाने एका अनोळखी भिक्षेकऱ्याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घातला. त्यातच त्या भिक्षेकऱ्याचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास नाना पेठेत ही घटना घडली आहे. आता पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मोहित अमीर अंगीर (वय 30, रा. खडकी) असे अटक (Arrest) केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर या प्रकरणी रिझवान शेख (वय 41, रा. नाना पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पेठेतील पदमजी चौकातील पदपथावर मागील काही महिन्यांपासून भिक्षेकऱ्यांचा वावर वाढला आहे. रात्रीच्यावेळी भिक्षेकरी पदपथावर झोपतात.
मारहाण आणि शिवीगाळ
सोमवारी रात्री सव्वा वाजण्याच्या सुमारास मोहित अंगीर हा तरुण पदमजी चौकातील पदपथावर झोपण्यासाठी आला होता. मात्र तेथे अगोदरच झोपलेल्या एका अनोळखी भिक्षेकऱ्याने त्याला झोपण्यास विरोध केला. तसेच त्यास शिवीगाळही केली. या प्रकारामुळे चिडलेल्या अंगीरने तेथेच पडलेला सिमेंटचा ब्लॉक उचलून भिक्षेकऱ्याच्या डोक्यात घातला. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने भिक्षेकऱ्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी रक्ताचा सडाच पडलेला पाहायला मिळाला.
परिसरात वाढला भिक्षेकऱ्यांचा वावर
याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन आरोपीलाही तत्काळ अटक केली. आता या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव करीत आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून परिसरात भिक्षेकऱ्यांचा वावर प्रचंड वाढला आहे. त्यांच्यात अनेकवेळा वादही होतात. हे वाद टोकाला जातात. सोमवारीही झोपण्याच्या क्षुल्लक कारणावरून तरुणाचा भिक्षेकऱ्यासोबत वाद झाला. त्याचा परिणाम खुनात झाला आहे. पोलिसांनी गस्त वाढवून असे प्रकार होणार नाहीत, याची काळजी घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे