पंतप्रधानांच्या बैठकीला उद्धव ठाकरेंची दांडी, राज्यात मोठी चर्चा, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गैरहजरी हा राज्यातील चर्चेचा मुद्दा ठरला आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील आज पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली.
![पंतप्रधानांच्या बैठकीला उद्धव ठाकरेंची दांडी, राज्यात मोठी चर्चा, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया पंतप्रधानांच्या बैठकीला उद्धव ठाकरेंची दांडी, राज्यात मोठी चर्चा, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/01/15194435/Ajit-Pawar-compressed-5.jpg?w=1280)
पुणेः देशीतल कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गैरहजरी हा राज्यातील चर्चेचा मुद्दा ठरला आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीदेखील आज पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गेल्या अनेक दिवसांपासून जाहीर कार्यक्रम, बैठकांमध्ये सहभागी झालेले नाहीत. तसेच विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही त्यांनी उपस्थिती लावली नाही. शुक्रवारी झालेल्या पंतप्रधानांसोबतच्या कोरोना आढावा बैठकीतही ते उपस्थित नव्हते.
गैरहजेरीवर काय म्हणाले अजित पवार?
पंतप्रधानांच्या बैठकीला मुख्यमंत्री गैरहजर राहिले यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘ प्रत्येक वेळी मीटिंगला प्रत्येकानेच उपस्थित राहणे आवश्यक नसते. कुणाची काही अडचण असू शकते. कुणी कोरोनामुळे क्वारंटाइन असतं. मात्र पंतप्रधानांसोबतच्या बैठकीला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सीताराम कुंटे, दिलीप चक्रवर्ती आदी उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी राज्यातील लसीकरणाविषयीची समस्या मांडली. 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मोठ्या संख्येने लसीकरण केंद्रांकडे येत आहेत. मात्र लसीचे डोस कमी पडत आहे. हा पुरवठा वाढवण्यासंबंधीची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली. तसेच साठ वर्षांपुढील व्यक्तींनी बूस्टर डोस घ्यावा, असं सांगितलं जातंय, त्याकरिताही केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली. ‘
…त्यात राजकीय टीकेचं कारण नाही!
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहिले नाही, यावरून राजकारण किंवा टीका टिप्पणी करायचं कारण नाही. राज्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेणं हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे, ते व्यवस्थित सुरु आहे. त्यांच्या टीमचे सहकारी म्हणून आम्ही, तसेच इतर सर्व अधिकारी योग्य काम करत आहेत. टास्क फोर्समधील विख्यात डॉक्टर्स या सर्व प्रकारावर लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्रीदेखील स्वतः दररोज या सर्व घडामोडींचा आढावा घेतात. त्यामुळे यात राजकारण करण्यासारखं काहीच नाही.’
इतर बातम्या-