Rajgurunagar : स्वागतार्ह..! वाढदिवसानिमित्त स्वखर्चानं उचलला पुणे-नाशिक महामार्गावरचा कचरा; राजगुरूनगरातल्या दाम्पत्याचा उपक्रम
राजगुरूनगर येथील संतोष उर्फ पप्पूशेठ मुरलीधर राक्षे आणि त्यांची पत्नी राणी संतोष राक्षे यांनी वाढदिवसाच्या (Birthday) निमित्ताने समाजाच्या हिताचे काहीतरी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून हे कार्य केले.
राजगुरूनगर, पुणे : राजगुरूनगर (Rajgurunagar) येथील एका पती-पत्नीने वाढदिवसानिमित्त पुणे-नाशिक महामार्गावरील जुन्या पुलाजवळील मोठ्या प्रमाणात लोकांनी टाकलेला कचरा स्व:खर्चातून जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने उचलून नेत परिसर स्वच्छ केला. हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मभूमीत प्रवेश करताना परिसर स्वच्छ (Clean) ठेवला पाहिजे, याची जाणीव ठेवावी ही अपेक्षा करता या परिवाराने वाढदिवशी सामजिक उपक्रम हाती घेत परिसर स्वच्छ केला आहे. राजगुरूनगर येथील संतोष उर्फ पप्पूशेठ मुरलीधर राक्षे आणि त्यांची पत्नी राणी संतोष राक्षे यांनी वाढदिवसाच्या (Birthday) निमित्ताने समाजाच्या हिताचे काहीतरी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून हे कार्य केले. राक्षे पती-पत्नीने हुतात्मा सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष कैलास दुधाले यांच्याकडे सल्ला घेतला. त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर हा उपक्रम राबविला.
कचऱ्यामुळे दुर्गंधी
राजगुरूनगर हे शहर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थळ आहे. मात्र शहरात अनेक ठिकाणी कचरा पाहायला मिळतो. शहरातील पुणे-नाशिक महामार्गावर पडलेल्या कचऱ्याने दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे त्याठिकाणची स्वच्छता महत्त्वाची होती. हा दृष्टीकोन ठेवून समाजहित साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. राक्षे यांनी मग कोणताही विचार न करता शहराच्या जवळ असलेला हा कचरा स्वखर्चाने जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या साह्याने उचलत संपूर्ण परिसर साफ करून वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी उपक्रम हाती घेतला.
‘स्वच्छचा ठेवा’
वाढदिवसानिमित्त जरी स्वखर्चाने परिसर स्वच्छ केला असला तरी नागरिकांनी आपल्या परिसराची स्वच्छता नेहमीच ठेवायला हवी, असे मत संतोष राक्षे यांनी मांडले. ऐतिहासिक दृष्टीने शहर महत्त्वाचे आहे. त्याबरोबरच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने परिसर अस्वच्छ असणे रोगाला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा, जेणेकरून प्रशासनावरदेखील ताण येणार नाही. अनेक ठिकाणी कचराकुंड्या आहेत. बऱ्याचवेळा नागरिक लांबूनच कचरा फेकतात. त्यामुळे कचराकुंडीच्या आसपासचा परिसर अस्वच्छ झालेला असतो. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीचे भान ठेवत रोगराईला आमंत्रण देईल, अशी अस्वच्छता टाळावी, असे ते म्हणाले.