Pune : माजी नगरसेविकेविरोधात पुणे पालिका आयुक्तांकडे तक्रार; अजितदादांना सांगून नोकरी घालवेन, असा अधिकाऱ्याला दिला होता दम
नामफलक झाकून ठेवल्याचा जाब विचारण्यास त्या थेट दुसऱ्या मजल्यावर बसलेल्या उपअधीक्षक प्रदीप भुजबळ यांच्याकडे गेल्या. माझा बोर्ड का काढला? असे म्हणत त्यांनी भुजबळ यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली होती.
पुणे : उपमुख्यमंत्री अजितदादांना सांगून तुझी नोकरी घालवेन, असा दम राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका पूजा कोद्रे (Pooja Kodre) यांनी अधिकाऱ्याला दिला आहे. नामफलक काढल्यामुळे संतप्त झालेल्या पूजा कोद्रे यांनी हडपसर क्षेत्रीय कार्यालयात गोंधळ घातला. हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे उपअधीक्षक प्रदीप भुजबळ (Pradeep Bhujbal) यांच्याशी हा वाद घालण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी पूजा कोद्रे यांच्याविरोधात पालिका आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. याच घटनेच्या निषेधार्ध कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. बुधवारी हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालयात हा प्रकार घडला होता. मुंढव्याच्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका पूजा कोद्रे बुधवारी मीटिंगसाठी आल्या होत्या. यावेळी प्रवेशद्वारावरचा त्यांच्या नावाचा फलक (Board) झाकून ठेवल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकारामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कामातही काहीकाळ अडथळा निर्माण झाला होता.
‘कोणाकडे तक्रार करायची असेल ती कर’
नामफलक झाकून ठेवल्याचा जाब विचारण्यास त्या थेट दुसऱ्या मजल्यावर बसलेल्या उपअधीक्षक प्रदीप भुजबळ यांच्याकडे गेल्या. माझा बोर्ड का काढला? असे म्हणत त्यांनी भुजबळ यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर भुजबळ यांनी बोर्ड लावला आणि त्याचा फोटोही त्यांना पाठवला, मात्र कोद्रे संतप्त झालेल्या असल्याने काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगून तुझी नोकरी घालविते, माझ्या नादी लागू नको, तुला माहीत नाही, मी किती मोठी गुंड आहे. तू ऑफिसमध्ये येतो कसा हेच मी बघते, तुला घरात घुसून मारीन, तुला कोणाकडे तक्रार करायची असेल ती कर, अशी भाषा वापरून कार्यालयीन कामातही अडथळा आणला. जवळपास 20 मिनिटे हा प्रकार सुरू होता.
कर्मचाऱ्यांकडून घटनेचा निषेध
या घटनेचा निषेध म्हणून हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. याबाबतची तक्रार महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी हडपसर मुंढवा साहायक आयुक्त कार्यालयाचे साहायक आयुक्त प्रसाद काटकर यांनी सांगितले, की बुधवारी दुपारी माजी नगरसेविका कोद्रे कार्यालयामध्ये आल्या होत्या. त्यांनी येथील अधिकारी भुजबळ यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले असून माजी नगरसेविकेविरोधात महापालिका आयुक्तांकडे पत्रही देण्यात आले आहे.