मृत मुस्लिमांकडूनही मतदान करून घ्या, राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक मेळाव्यातून धक्कादायक आवाहन
कसबा मतदार संघातील जवळपास 1500 मुलं, मुली हे सौदी, दुबई आणि कुवेतमध्ये राहतात. त्यांना मतदानाला बोलवा असं मी म्हणालो. ही मुलं येत जात राहतात आणि त्यांनाच त्यादिवशी बोलून घ्या असं मी म्हणालो.
पुणे : मृत मुस्लिमांकडूनही मतदान करून घ्या. सौदी आणि दुबईला गेलेल्यांना बोलावून घ्या. त्यांना मतदान करायला सांगा. जोपर्यंत आपण मोठ्या प्रमाणावर मतदान करणार नाही. तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पराभूत करू शकत नाही, असं आवाहन राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक मेळाव्यातून करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून हे धक्कादायक आवाहन केल्याने हा मेळावा वादात अडकला आहे. या मेळाव्यावर भाजपने जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस धार्मिक ध्रुवीकरण करत असल्याची टीका भाजपने केली आहे.
पुण्यात भाजपने अल्पसंख्याक मेळाव्याचं आयोजन केलं होतं. कसब्यातील उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी नगरसेवक उस्मान हिरौली यांनी मुस्लिमांना मतदानासाठी आवाहन करणारं भाषण केलं. येत्या 26 तारखेला मतदान आहे. जेवढी लोकं दुबईत गेली असतील, सौदीला गेली असतील त्या सर्वांना बोलवा. सर्वांकडून मतदान करून घ्या.
ज्यांचा मृत्यू झाला त्यांनाही 26 तारखेला हजर करा आणि मतदान करायला सांगा. जोपर्यंत मतदान करण्यात आघाडी घेणार नाही तोपर्यंत आपण संघ आणि मोदींना पराभूत करू शकणार नाही, असं आवाहन उस्मान हिरौली यांनी केलं होतं. हिरौली यांच्या या आवाहनामुळेच पुण्यातील राष्ट्रवादीचा मेळावा वादग्रस्त ठरला असून त्यावर भाजपने टीका केली आहे.
कोणत्या लोकशाहीत बसतं?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक मेळाव्यावर जोरदार टीका केली आहे. अशा प्रकारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी ध्रुवीकरण करत असतील आणि मोदींना पराभूत करण्यासाठी मृत मुस्लिमांनाही मतदान करण्यास सांगत असेल तर हे कोणत्या लोकशाहीत बसतं? याचा निषेध होणारच आहे. ध्रुवीकरण करण्याचं काम राष्ट्रवादीचं सुरू आहे. ते खपवून घेणार नाही. राष्ट्रवादीकडून जातीयवादी राजकारण सुरू आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
म्हणून माझ्यावर आरोप
दरम्यान, या वादग्रस्त भाषणानंतर उस्मान हिरौली यांच्यावर टीका होऊ लागल्याने हिरौली यांनी आता सावरासावर केली आहे. माझ्यावर चित्रा वाघ यांनी केलेली टीका टिपिकल आहे. टिपिकल भाजप नेत्यांनी करावी अशी ही टीका आहे. कसबा विधानसभेचे चित्र आता त्यांना स्पष्ट दिसत आहेत त्यामूळे हे आरोप केले जात आहेत. माझ्या तोंडी चित्रा वाघ यांनी चुकीचे स्टेटमेंट घातलं आहे, असं हिरौली म्हणाले.
चित्रा वाघ यांना जिहाद कळतो का?
कसबा मतदार संघातील जवळपास 1500 मुलं, मुली हे सौदी, दुबई आणि कुवेतमध्ये राहतात. त्यांना मतदानाला बोलवा असं मी म्हणालो. ही मुलं येत जात राहतात आणि त्यांनाच त्यादिवशी बोलून घ्या असं मी म्हणालो. त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करा असा संदेश मी समाजाला दिला. मतदान वाढावं हाच उद्देश आहे. ज्यांचे जमीर मेले त्यांनी मतदान करा असं आवाहन केलं होतं.
त्यांना मतदानासाठी बोलवा असे म्हणालो होतो. माझ्या म्हणण्याचा अर्थ एवढाच की मतदान करा बाकी काही अर्थ नाही, असं हिरौली म्हणाले. जिहादचा आरोप अत्यंत चुकीचा आहे. किती दिवस आमच्या समाजाने तो आरोप सहन करायचा? चित्रा वाघ यांना जिहाद कळतो का? असा सवाल त्यांनी केला.