महाविकास आघाडीत बिघाडी, पुणे लोकसभा निवडणुकीवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपली, संजय राऊत म्हणाले…
pune lok sabha election medha kulkarni : पुणे लोकसभा पोटनिवडणूक अजून जाहीर झालेली नाही. परंतु काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यांत वाद सुरु झाला आहे. या जागेवर शनिवारी पुन्हा दोन्ही पक्षांनी दावे केले आहे. यामुळे निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षाचा वाद रंगला आहे.
योगेश बोरसे, पुणे : भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं काही महिन्यांपूर्वी निधन झालं. त्यांच्या निधनामुळे पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. येत्या सहा महिन्यात या जागेवर निवडणूक होणार आहे. त्यामुळे या जागेसाठी महाविकास आघाडीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी राजकीय नेत्यांची वक्तव्ये येत आहेत तर काही इच्छुकांनी बॅनरबाजी सुरु केली आहे. काँग्रेसकडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांची तयारी आहे तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी चालवली आहे. यावरुन शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार अन् काँग्रेस नेते मोहन जोशी यांच्यांत कलगीतुरा रंगला. या वादात संजय राऊत यांनीही उडी घेतली.
काय म्हणाले अजित पवार
पुणे लोकसभा पोटनिवडणूक लागली तर महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल? याची सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. त्यावर आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्याची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. ज्यांची जिथं जास्त ताकद आहे. तिथं त्या पक्षाच्या उमेदवाराला तिकीट द्यायचं. ताकद जास्त म्हणजे वजन करायचे का? तर नाही…मागील निवडणुकीत ज्यांना जास्त मते त्यांची ताकद जास्त असे समजता येईल. आमच्या मित्र पक्षांना बोलण्याचा अधिकार आहे. आमच्या मित्र पक्षाला शुभेच्छा!, असे मोजक्या शब्दांत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
मोहन जोशी काय म्हणतात
अजित पवार यांना प्रत्युत्तर देताना काँग्रेस नेते मोहन जोशी म्हणाले की, पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचीच जास्त ताकत आहे. शिवाय पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील 6 पैकी 4 विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार काही हजार मतांनी पराभूत झाले आहेत. त्यावरुन काँग्रेसचे वर्चस्व दिसून येते, असे प्रत्युत्तर मोहन जोशी यांना अजित पवार यांना दिला.
संजय राऊत यांची उडी
काँग्रेस अन् राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादात संजय राऊत यांनीही उडी घेतली. कोणाची कुठे जास्त ताकद आहे, हे सर्व पक्ष मिळवून ठरवतील. तिन्ही पक्षांची बैठक होईल, त्यात लोकसभेच्या जागेचा निर्णय घेण्यात येईल, असे राऊत यांनी सांगितले.
भाजपकडून ही नावे चर्चेत
गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार मेधा कुळकर्णी, जगदीश मुळीक आणि माजी खासदार संजय काकडे या नावांवर सध्या भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. संजय काकडे, मेधा कुळकर्णी आणि मुरलीधर मोहोळ यांना राजकीय अनुभव मोठा आहे. तर स्वरदा बापट या नवख्या आहेत. जगदीश मुळीक हे भाजपचे पुणे शहर अध्यक्ष आहेत. त्यांचे पुणे शहरात भावी खासदार म्हणून बॅनर लावण्यात आले होते. त्यावरुन टीकाही झाली होती. या सर्व प्रकरणात भाजप कुणाला तिकीट देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.