Vaccination : कॉर्बेव्हॅक्सला अजूनही प्रतिसाद कमीच, पाच महिन्यांत फक्त 42% लसीकरण; पालकांच्या संभ्रमावस्थेमुळे अपव्यय जास्त
पुणे, मुंबई, ठाणे आणि नागपूरसारख्या मोठ्या शहरी केंद्रांनी राज्य सरासरीपेक्षा कमी कॉर्बेव्हॅक्स कव्हरेज नोंदवले आहे. लसीकरण केंद्रावरील एका अधिकाऱ्याने सांगितले, की पाऊस आणि सुट्ट्यांमुळे शाळांसाठी नियोजित शिबिरे होऊ शकली नाहीत.
पुणे : राज्यातील 12-14 वयोगटातील लक्ष्यित लोकसंख्येपैकी केवळ 42% लोकांना कॉर्बेव्हॅक्सचे (Corbevax) दोन डोस देण्यात आले आहेत. या वयोगटासाठी कोविड लसीकरण सुरू झाल्यानंतर पाच महिन्यांनंतरची ही स्थिती आहे. राज्यात या गटात जवळपास 40 लाख मुले आहेत. 70% मुलांनी पहिला डोस घेतला आहे, रिपोर्टमध्ये ही माहिती उघड झाली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली. 12-14 वयोगटात प्रतिसाद कमी आहे. परिणामी, कॉर्बेव्हॅक्सचा अपव्यय (ऑगस्ट 9 पर्यंत) राज्यात सरासरी 13% आहे. तुलनेने कोवॅक्सिनसाठी 3.5% आणि कोविशील्डसाठी (Covishield) फक्त 0.4% अपव्यय असल्याची माहिती देण्यात आली आहे. कॉर्बेव्हॅक्सची 10 मिलीलीटरची कुपीच्या माध्यमातून 20 मुलांना लस देण्यात येते. एकदा ती उघडली, की ती चार तासांच्या आत वापरावी लागते. कमी प्रतिसादामुळे बर्याच लसीकरण (Vaccination) केंद्रांकडे कुपी पूर्णपणे वापरण्यासाठी आवश्यक असलेले 20 लोक नाहीत. त्यामुळे ती वाया जातो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आकडेवारी काय?
पुणे, मुंबई, ठाणे आणि नागपूरसारख्या मोठ्या शहरी केंद्रांनी राज्य सरासरीपेक्षा कमी कॉर्बेव्हॅक्स कव्हरेज नोंदवले आहे. लसीकरण केंद्रावरील एका अधिकाऱ्याने सांगितले, की पाऊस आणि सुट्ट्यांमुळे शाळांसाठी नियोजित शिबिरे होऊ शकली नाहीत. योगायोगाने, नाशिक आणि सांगली 72% Corbevax कव्हरेजसह सध्या राज्यात आघाडीवर आहेत. 9 ऑगस्टपर्यंत, मुंबईचे 26% कव्हरेज (दोन-डोस) हे टॅलीमध्ये सर्वात कमी आहे.
‘शाळांमध्ये विशेष लसीकरण शिबिरे सुरू व्हावीत’
राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले, की एकदा शाळांमध्ये विशेष लसीकरण शिबिरे सुरू झाल्यावर कॉर्बेवॅक्सचा अपव्यय कमी होण्याची शक्यता आहे. परभणीमध्ये सुमारे 30% अपव्यय नोंदविला गेला आहे. त्यानंतर पालघर आणि गोंदिया या दोन्ही राज्यांनी 27%पेक्षा जास्त अपव्यय नोंदविला आहे.
पालक संभ्रमात
पालक, शाळा पुन्हा सुरू झाल्यानंतर, लसीकरण केंद्रांकडे जात नाहीत. याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि आम्ही ते हर घर दस्तक कार्यक्रमाद्वारे करत आहोत. परंतु प्रतिसाद खूपच कमी आहे, असे एका आरोग्य कर्मचाऱ्याने सांगितले. अनेक कुटुंबांना कॉर्बेव्हॅक्स लसीकरण करावे, की नाही, याविषयी संभ्रम आहे. त्यामुळे त्यांच्याकडून निर्णय होत नाही. हेदेखील कार्बेवॅक्सचा अपव्यय होण्याचे कारण असल्याचे सांगण्यात आले आहे.