चार वर्षीय चिमुकल्याचा वाढदिवशीचं मृत्यू, अंधारात घडली दुर्घटना
आपला वाढदिवस साजरा करून झाल्यानंतर हा चिमुकला आपल्या कुटुंबीयांसमवेत बाहेर जात होता.
नावेद पठाण, Tv9 मराठी, प्रतिनिधी, पुणे : बारामतीत हृदय पिळवटून टाकणारी अपघाताची बातमी समोर आली आहे. या अपघातात कुटुंबीयांसमवेत (Family) रस्त्याने जाणाऱ्या चार वर्षीय निष्पाप चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना शहरातील इंदापूर (Indapur) रोडवरील हॉटेल जय शिवमसमोर काल रात्री अकाराच्या सुमारास घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे अपघात झाला तेव्हा या रस्त्यावर अंधार होता. ज्या चिमुकल्याचा मृत्यू झाला त्याचा वाढदिवसही (Birthday) होता.
रस्त्यावरील वाहतूक बंद करण्याच्या उद्देशाने काल हॉटेल जय शिवमसमोरील चौकात बॅरिगेट्स लावण्यात आले होते. मात्र मद्यधुंद अवस्थेत आणि प्रचंड वेगात असलेल्या दुचाकीस्वाराने रस्ता बंद करण्यासाठी लावलेल्या लोखंडी शिडीला जोरदार धडक दिली.
अन् काही कळायच्या आताच आपल्या कुटुंबीयांसमवेत आंबेडकर पुतळ्याच्या दिशेने जाणाऱ्या त्या चिमुकल्याच्या डोक्यात ती लोखंडी शिडी आदळली. या अपघातात चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दुचाकीस्वाराला ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी करत त्याला अटक केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
आपला वाढदिवस साजरा करून झाल्यानंतर हा चिमुकला आपल्या कुटुंबीयांसमवेत बाहेर जात होता. डॉ. आंबेडकर पुतळा स्मारक येथे सुरू असलेला गाण्यांचा कार्यक्रम बघण्यासाठी आंबेडकर पुतळ्याच्या दिशेने जात होता.
मात्र त्याचवेळी मद्यधुंद अवस्थेत आणि प्रचंड वेगात असलेल्या दुचाकीस्वाराने लोखंडी शिडीला धडक दिली. ती शिडी त्या चिमुकल्याच्या डोक्यात आदळल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला.
कुटुंबीयांच्या समोरच हा अपघात झाल्याने कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. चिमुकल्याचे आई, वडील आणि कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.