कोथरूडमध्ये खळबळ! शरद मोहोळच्या हत्येला एक महिना झाल्यावर स्वाती मोहोळ यांना मुन्ना पोळेकरच्या नावाने ‘तो’ मेसेज
कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला आहे. शरद मोहोळ याच्या हत्येला महिना होऊन नाही गेला तर मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांना मेसेज आला आहे. तो मेसेज मुन्ना पोळेकर याच्या नावाने आला आहे.
पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्येला आज एक महिना पूर्ण झाला आहे. कोथरूड परिसरातील सुतारदरा या भागात त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मुन्ना उर्फ साहिल पोळेकर आणि दोन साथीदारांनी भरदिवसा गोळ्या घालत जागीच ठार केलं होतं. मारेकरी फक्त मोहरे होते पण या हत्येमागचे खरे मास्टरमाईंड मुळशीतीलच गुंड विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे असल्याचं तपासात समोर आलं आहे. अशातच बरोबर एक महिना झाल्यावर शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना मेसेज आला आहे. या मेसेजमुळे कोथरूड परिसरात खळबळ उडाली आहे.
कोणी दिली जीवे मारण्याची धमकी?
शरद मोहोळ हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या मुन्ना पोळेकर याच्या नावाने अकाऊंट बनवण्यात आलं आहे. या अकाऊंटवरून स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियावर स्वाती मोहोळ यांना मेसेज आक्षेपार्ह पोस्ट करत धमकी देण्यात आली आहे. धमकी देणारा कोण आहे? याचा गुन्हे शाखेकडून अधिक तपास सुरू आहे.
शरद मोहोळच्या हत्येमागचे मास्टरमाईंड
शरद मोहोळ याला संपवण्यासाठी मुळशीमधीलच गुंडांनी आधीपासून फिल्डिंग लावली होती. संदीप मोहोळ याला संपवणार गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार यांनी मुन्ना पोळेकर याला मोहरा बनवत ट्रॅप लावला. शरद मोहोळच्या गँगमध्ये मुन्नाला पेरत त्याने मोहोळचा विश्वास जिंकला. शरद मोहोळ याची सावली बनून फिरणाऱ्या पोळेकर यानेच मोहळच्या लग्नाच्या वाढदिवशी त्याच्यावर गोळ्या झाडत हत्या केली.
दरम्यान, पुणे पोलिसांनी मुख्य आरोपी मुन्ना पोळेकरसह त्याचे दोन साथीदार, पोळेकर याचा मामा नितीन कानगुडेसह त्याचे सहकारी त्यासोबतच वाघ्या मारणे, विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांना अटक झाली आहे. पोलीस आता गणेश मारणेची चौकशी करत आहेत. गणेश मारणे याला नाशिकमधून अटक करण्यात आलेली.