Pune : ढकलाढकली, चेंगराचेंगरी वाढली! डेक्कन क्वीन अन् सिंहगड एक्स्प्रेसचे कमी केलेले जनरल डबे पुन्हा वाढवण्याची मागणी
रेल्वेच्या प्रवासी संघाचे इक्बाल भाईजान मुलाणी यांनी रेल्वेला निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, की सिंहगड एक्स्प्रेसचे कमी केलेले दोन डबे पुन्हा सुरू करावे. त्यामुळे जनरल डब्याने प्रवास करणाऱ्यांची गैरसोय दूर होईल.
लोणावळा, पुणे : मध्य रेल्वेच्या (Central rail) पुणे मुंबई सिंहगड एक्स्प्रेस आणि डेक्कन क्वीन या गाड्याचे जनरल डब्बे कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे या गाड्यांमधून दैनंदिन मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. या गाड्यांच्या बोगींची संख्या वाढवून डबे पूर्ववत करण्यात यावेत, अशी मागणी पिंपरी-चिंचवड रेल प्रवासी संघाकडून मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकाकडे (General Manager of Railway) करण्यात आली आहे. डेक्कन क्वीन आणि सिंहगड एक्स्प्रेस एलएचबी कोचसह नव्या स्वरुपात सुरू केल्या आहेत. मात्र, या दोन्ही गाड्यांचे जनरल डबे कमी केल्यामुळे अनारक्षित तिकीटधारकांची मोठी गैरसोय होत आहे. डेक्कन क्वीनला (Deccan Queen) एकच जनरल डबा आहे. या गाडीला आधीच नोकरदार तसेच सामान्य प्रवाशांची गर्दी असते. आता जनरल डबा कमी केल्याने या डब्यामध्ये उभे राहणेही मुश्कील होते.
आरक्षित तिकीटधारकांना प्रचंड त्रास
जनरल डबा कमी केल्याने तिकीटधारकांना आरक्षित डब्यांमधून प्रवास करावा लागत आहे. याचा आरक्षित तिकीटधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. सिंहगड एक्स्प्रेस मार्च 2020पर्यंत 19 डब्यांची होती. त्यानंतर 21 मार्च 2022पर्यंत 16 डब्यांची झाली. सध्या ही गाडी 14 डब्यांची असून दोन जनरल डबे कमी केले आहेत. तर डेक्कन क्वीन एक्स्प्रेसची एक जनरल बोगी कमी केली आहे. या दोन्ही गाड्या प्रामुख्याने मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी आहेत.
लहान मुले, महिला आणि वृद्धांचे अधिक हाल
रेल्वेच्या प्रवासी संघाचे इक्बाल भाईजान मुलाणी यांनी रेल्वेला निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, की सिंहगड एक्स्प्रेसचे कमी केलेले दोन डबे पुन्हा सुरू करावे. त्यामुळे जनरल डब्याने प्रवास करणाऱ्यांची गैरसोय दूर होईल. डबे कमी केल्याने आसनसंख्या जवळपास 1300पर्यंत कमी झाली. त्यामुळे सहाजिकच प्रवाशांची गैरसोय झाली आहे. डब्यात प्रचंड गर्दी होत आहे. त्यामुळे उभे राहून तेदेखील अत्यंत कमी जागेत प्रवास करावा लागत आहे. यात लहान मुले, महिला आणि वृद्धांचे अधिक हाल होत आहेत. त्यामुळे पुन्हा डब्यांची संख्या वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.