सोमवारपासून पुणे शहरातील निर्बंध शिथिल करणार, पण लक्षात ठेवा…; अजितदादांनी बजावले
पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांच्या आत असेल, तर याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे कोरोना दक्षता नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. (Ajit Pawar comment on Pune Corona Restrictions)
पुणे : पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची घटती संख्या विचारात घेता पुणे शहरातील निर्बध शिथील करण्यात येणार आहे. येत्या सोमवारपासून कोरोना निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात निर्णय लागू केला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हीटी दर पाच टक्क्यांच्या आत राहिला, तरच हा निर्णय लागू होईल. मात्र पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण क्षेत्रात मात्र यापुर्वीचेच निर्बंध कायम राहतील, असेही अजित पवार यांनी सांगितले. (Deputy CM Ajit Pawar Pune comment on Corona Restrictions to be Relaxed from monday)
पुण्यातील कॉऊन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पुणे जिल्ह्यातील कोरोना विषाणूची सद्यस्थिती, म्युकरमायकोसीसची सद्यस्थिती, प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण, ऑक्सीजन उपलब्धता, ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा इत्यादी विषयांबाबत चर्चा करण्यात आली.
पॉझिटिव्हीटी रेट विचारात घेऊनच निर्णय
पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या घटू लागली आहे. ही समाधानाची बाब आहे. त्यामुळे येत्या सोमवारपासून हे नवीन नियम लागू केले जाणार आहेत. मात्र, सोमवारपासून ही परवानगी देण्याआधी राज्यसरकारने ठरवून दिलेल्या निकषाचाही विचार केला जाणार आहे. पॉझिटिव्हीटी रेट विचारात घेवूनच हा निर्णय घेतला जाणार आहे. पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांच्या आत असेल, तर याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे कोरोना दक्षता नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पुण्यात लसीकरणाच्या वेग वाढण्याच्या सूचना
पुणे जिल्हयात लसीकरणाचा वेग वाढविण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. लस उपलब्धतेबाबत सातत्याने आपला पाठपुरावा सुरू असून दिव्यांग बांधवाना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. तसेच परदेशात शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्यांचेही लसीकरणाबाबत आदेश देण्यात आले आहेत. पुणे जिल्हयात दररोज एक लाखापर्यंत लसीकरण होईल, एवढी क्षमता निर्माण करण्यात आली आहे, लस उपलब्धतेप्रमाणे यामध्ये गती घेता येईल. ३१ ऑगस्टपर्यंत मोठया प्रमाणात लसीकरणाचे काम होईल, असे नियोजन असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
म्युकरमायकोसिसच्या उपचाराचाही आढावा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्युकरमायकोसिसचे निदान लवकर होणे आवश्यक असते. त्यानुसार म्युकरमायकोसिसची लक्षणे, काळजी, उपचार यांची माहिती ग्रामीण भागात सर्वदूर पोहोचवावी. तसेच म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी वापरण्यात येणा-या इंजेक्शनचा तुटवडा तसेच उपलब्धतेबाबतचाही आढावा घेतला.
त्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत कान, नाक, घसा तसेच इतर लक्षणे जाणवताच तातडीने रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच शासन आणि प्रशासनाच्या प्रयत्नांनी व नागरिकांच्या सहकार्याने बाधितांची संख्या घटली असली तरीही संसर्ग पुन्हा वाढू नये, यासाठी प्रत्येकाने खबरदारी घ्यावी आणि नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही केले.
ग्रामीण यंत्रणा अधिक सक्षम होणे गरजेचे
कोरोना रोखण्यासाठी विविध स्तरावर उपचार यंत्रणा निर्माण करण्यात आली. दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात बाधितांची संख्या वाढली. त्यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता ग्रामीण यंत्रणा अधिक सक्षम होणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक त्या सुविधा उभारणीवर भर देण्याचे निर्देशही अजित पवार यांनी यंत्रणेला दिले.
पुण्यात कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक झाली. कोरोना विषाणूची सद्यस्थिती, म्युकरमायकोसिसची सद्यस्थिती, प्रशासनाच्या वतीनं करण्यात येणाऱ्या उपाययोजना,लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा, लसीकरण, ऑक्सिजन उपलब्धता,ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा आदी विषयांबाबत माहिती घेतली. pic.twitter.com/vOqi3DDBaf
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 11, 2021
(Deputy CM Ajit Pawar comment on Pune Corona Restrictions to be Relaxed from monday)
संबंधित बातम्या :
मानाच्या 10 पालख्यांना आषाढी वारीसाठी परवानगी; अजित पवारांची मोठी घोषणा
शरद पवार-प्रशांत किशोर भेट राजकीय नाही; लोकसभेच्या रणनीतीचाही प्रश्नच नाही: अजित पवार