VIDEO: फडणवीस म्हणाले, शिवसेनेला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद दिलं नाही ही चूक होती; विक्रम गोखलेंच्या दाव्याने खळबळ
शिवसेना-भाजपची युती झाली नाही. त्याबाबत मी देवेंद्र फडणीसांना विचारणा केली. शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद का दिलं नाही? असा सवाल मी त्यांना केला.
पुणे: शिवसेना-भाजपची युती झाली नाही. त्याबाबत मी देवेंद्र फडणीसांना विचारणा केली. शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद का दिलं नाही? असा सवाल मी त्यांना केला. त्यावर फडणवीसांनी चूक झाल्याचं सांगितलं, असा खळबळजनक दावा ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केला आहे. गोखले यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली असून राजकीय तर्कवितर्कांनाही उधाण आलं आहे.
पुण्यात एका कार्यक्रमात विक्रम गोखले यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेना-भाजपला एकत्रं आणण्याचे माझे प्रयत्न सुरू आहेत. अडीच वर्ष शिवसेनेला दिले असेल तर काय बिघडलं असतं असा प्रश्न मी एकदा फडणवीसांना विचारला होता. त्यातही आधीची अडीच वर्ष तुम्हाला हवी की नंतरची हवी? असा सवालही मी त्यांना केला होता. त्यावर चूक झाली असं फडणवीस मला म्हणाले होते, असा दावा विक्रम गोखले यांनी केला.
एकट्या फडणवीसांची चूक
खरं तर ही एकट्या फडणवीसांची चूक नाही. त्यांच्यात जे काही झालं होतं, त्याबाबत त्यांनी जनतेला विश्वासात घ्यायला हवं होतं. लोकांना फसवू नका तुम्ही. लोक केव्हा तरी प्रचंड शिक्षा करतात. ती आता आपण भोगत आहोत, असं ते म्हणाले. मी तोंड दाबण्याने बांधून घेत नाही. त्यामुळेच मी कोणत्याही राजकीय पक्षांना बांधिल नाहीये. मी फाडफाड बोलणारा माणूस आहे. मी वरचे आदेश बिदेश झुगारुन देतो, असंही त्यांनी सांगितलं.
मोदी आदर्श नायक
जे लोक पक्षाचं काम करतात त्याबद्दल मी त्यांना काही बोलत नाही. पक्षाचं काम सगळेच करतात. पण मोदी जेव्हा देशासाठी उभं राहतात तेव्हा ते माझे आदर्श नायक असतात. जाणीवपूर्वक आपआपली डोकी जागेवर ठेवून काम करा. पुन्हा एकदा माझी प्रामाणिक इच्छा आहे. आता जे चाललं आहे त्यातून बाहेर पडून भाजप-शिवसेनेने एकत्रं आले तर फार बरं होईल, असंही ते म्हणाले.
कंगनाच्या विधानाचं समर्थन
यावेळी त्यांनी अभिनेत्री कंगना रणावतच्या विधानाचं समर्थन केलं. कंगना म्हणाली की, भीक मागून स्वातंत्र्य मिळालं. तिच्या म्हणण्यावर मी सहमत आहे. हे स्वातंत्र्य दिलेलं आहे बरं का. ज्या योद्ध्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला. त्या योद्ध्यांना फाशी जाताना त्यावेळचे मोठमोठे लोक बघत राहिले. त्यांनी वाचवलं नाही. आपल्या देशातील हे लोक ब्रिटिशांविरोधात उभं राहत आहेत हे माहीत असूनही त्यांना वाचवलं नाही. असेही लोक आपल्या राजकारणात होते. भरपूर वाचलं आहे मी, असंही ते म्हणाले.
संबंधित बातम्या:
शिवसेना-भाजपने एकत्रं यायला हवं, त्याशिवाय पर्यायच नाही; ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचं रोखठोक मत