BREAKING : कसब्यात अजित पवारांच्या रॅलीत गोंधळ, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते समोरासमोर, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या रॅलीत गोंधळ उडाल्याची बातमी समोर आलीय. अजित पवार आज कसब्यात प्रचारासाठी आले असता हा गोंधळ झाला. या गोंधळामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
पुणे : पुण्यात कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. याशिवाय राज्यात शिवसेना (Shiv Sena) आणि ठाकरे गटामध्ये (Thackeray Group) सुरु असलेल्या संघर्षामुळे अनेक ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. त्याचाच प्रत्यय आज पुण्यातील कसब्यात बघायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या रॅलीत गोंधळ उडाल्याची बातमी समोर आलीय. अजित पवार आज कसब्यात प्रचारासाठी आले असता हा गोंधळ झाला. अजित पवार यांच्यासोबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) देखील होते. याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले.
कसब्या काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत अजित पवार आणि बाळासाहेब थोरात सोबत उपस्थित होते. विशेष म्हणजे ही रॅली ज्या परिसरातून जात होती तिथून काही अंतरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरु होती.
नेमकं काय घडलं?
या बैठकीला भाजप आणि शिवसेनेचे देखील कार्यकर्ते होते. ही रॅली संबंधित परिसरातून जात असताना तेव्ही भाजप, शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे परिसरात तणावाचं वातारण निर्माण झालं. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी शिंदेंचं गाणं डिजेवर लावलं.
या गोंधळात परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, असे संकेत पोलिसांना जाणवू लागले. त्यामुळे पोलिसांनी तातडीने मध्यस्थी करत वाद निवळण्याचा प्रयत्न केला. यावेळी अजित पवार स्वत: गाडी खाली उतरले आणि थोड्या अंतरावर पायी चालत गेले. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना दूर नेत गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्यांना वाद निवळण्यात यश आलं.
या गोंधळानंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अजित पवारांची रॅली शनिवार वाड्यापासून सुरु झालेली. तर तिथून काही अंतरावर चौकाजवळ असलेल्या शाळेत मुख्यमंत्री यांची भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत बैठक सुरु होती. याच दरम्यान हा गोंधळ झाला.