काकांच्या सत्तेत रोहित पवार यांच्या कंपनीवर ईडीची छापेमारी
Rohit Pawar Ed Raid | राष्ट्रवादी काँग्रेसच्या फूटीनंतर शरद पवार यांची बाजू सांभाळणारे आमदार रोहित पवार पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित सहा ठिकाणांवर अमलबजावणी संचालयाने (ED) छापेमारी सुरु केली आहे.
योगेश बोरसे, पुणे, दि. 5 जानेवारी 2024 | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार यांचे खंदे समर्थक असलेले रोहित पवार अडचणीत आले आहेत. आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित ठिकाणांवर अमलबजावणी संचालयाने (ED) छापेमारी सुरु केली आहे. शुक्रवारी पुणे, बारामती आणि इतर ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली. ईडीच्या पथकाने एकूण ६ ठिकाणी छापेमारी सुरु केल्याची माहिती मिळाली आहे. ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई केली आहे.
महाराष्ट्र प्रदूषण विभागाने दिली होती नोटीस
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाले. अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडली. अजित पवार भाजपसोबत गेले. अजित पवार यांच्यासोबत सुमारे 40 पेक्षा जास्त आमदार गेल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर शरद पवार यांच्याकडे मोजके आमदार राहिले. यावेळी शरद पवार यांची बाजू भक्कमपणे रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी सांभाळली. आता रोहित पवार पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. यापूर्वी बारामती अॅग्रो कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण विभागाने नोटीस दिली होती. 72 तासांत प्लँट बंद करण्याची सूचना नोटिसमध्ये दिली होती. त्यावेळी आमदार रोहित पवार यांनी स्वतः ट्वीट करत मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात ही माहिती दिली होती. त्यानंतर उच्च न्यायालयातून त्यांनी स्थगिती मिळवली होती.
का झाली कारवाई
रोहित पवार हे बारामती अॅग्रो कंपनीचे सीईओ आहेत. आता अमलबजावणी संचालयानलायने मनी लॉन्ड्रींग प्रकरणाच्या तपासाला सुरुवात झाली आहे. यामुळे बारामती अॅग्रो कंपनीच्या संबंधित लोकांच्या घरी छापेमारी सुरु करण्यात आली आहे. रोहित पवार यांचे काका अजित पवार हे सत्तेत आहेत. राज्याचे ते उपमुख्यमंत्री आहेत. त्यावेळी पुतण्याच्या कंपनीवर छापेमारी केली जात आहे. या प्रकरणात रोहित पवार किंवा त्यांच्या पक्षातील एकाही नेत्यांकडून प्रतिक्रिया अद्याप आली नाही.