Eknath Khadse : ‘…तर उद्धव ठाकरेंचेच आदेश मानायला हवेत, कायदाही हेच सांगतो’; एकनाथ खडसेंचं शिंदे गट आणि भाजपाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांनी जे सांगितलेले आहे, त्यानुसार आतल्या बाजूने भाजपाच्या मदतीनेच हे सर्व झालेले आहे, हे स्पष्ट आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
पुणे : 40 वर्षे राजकारणात आहे. मात्र अशा पद्धतीचे राजकारण मी कधीही अनुभवले नव्हते, असे राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. सध्याच्या राजकारणावर त्यांनी टीव्ही 9सोबत संवाद साधला. ते म्हणाले, की आधीच्या काळी पक्षांमध्ये फूट पडली. शरद पवार वेगळे झाले. काँग्रेस फुटली. मात्र कायदा त्यावेळी वेगळा होता. फुटीला मान्यता होती. मात्र आता त्याला मान्यता नाही. आताच्या कायद्यानुसार तुम्हाला कोणत्यातरी पक्षात विलीन व्हावे लागते. सध्या शिवसेना (Shivsena) कुणाची हा वाद होत आहे. ज्या पक्षाचे रजिस्ट्रेशन निवडणूक आयोगाकडे आहे आणि ज्या पक्षाला निवडणूक आयोगाने चिन्ह दिलेले आहे. सेना त्यांची असा कायदा सांगतो. या कायद्यानुसार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाच संपूर्ण अधिकार आहेत.
‘मग तर आजच अपात्र ठरतील’
शिंदे गट आम्ही सेनेतच असल्याचे सांगत आहे. मग असे असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंचे आदेश मानले पाहिजेच, कायद्यानुसार हेच योग्य आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले. बंडखोर, फुटलेल्या आमदारांना पक्षांतर बंदी कायद्यापासून सूट हवी आहे. त्यांनी जर आज म्हटले की आम्ही शिवसेनेपासून वेगळे झालो आहोत, तर ते आजच अपात्र ठरतात किंवा त्यांना भाजपा, मनसे, प्रहार अशा कोणत्यातरी पक्षात विलीन व्हावेच लागेल. आता पक्षात विलीन व्हायच्या आधी, अपात्रता टाळायची असेल तर त्यांना आम्ही शिवसेनेतच आहोत, असे सांगावे लागत आहे.
‘इंदिरा गांधीच्या काळातही झाला होता वाद’
इंदिरा गांधींच्या कालखंडात खरी काँग्रेस कुणाची असा वाद निर्माण झाला होता. हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला त्यावेळी चिन्ह गोठवले होते आणि दोघांनाही वेगळे चिन्ह दिले होते. तर ज्यांनी काँग्रेस स्थापन केली, त्यांचाच पक्ष असा निर्णय त्यावेळी झाला होता. आजही अशीच स्थिती आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे यांचीच खरी शिवसेना आहे, असे खडसे म्हणाले.
काय म्हणाले एकनाथ खडसे?
‘मध्यावधी निवडणुकीची शक्यता नाही
हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात आहे. ज्याच्याकडे चिन्ह त्याची परिस्थिती मजबूत असते. कारण गाव पातळी, वाड्या, वस्त्यांपर्यंत कार्यकर्त्यांच्या मेहनतीने पक्षा पोहोचलेला असतो. आता शिंदेंनी धनुष्यबाणावर दावा केला. न्यायालय चिन्ह गोठवू शकते, अशी शक्यताही खडसेंनी वर्तवली आहे. दरम्यान, ही परिस्थिती एका दिवसात निर्माण झालेली नाही. हा पूर्वनियोजित कट असावा. अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांनी जे सांगितलेले आहे, त्यानुसार आतल्या बाजूने भाजपाच्या मदतीनेच हे सर्व झालेले आहे, हे स्पष्ट आहे, असे ते म्हणाले. मध्यावधी निवडणुकीची शक्यता नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.