MSRTC electric buses : पुणे ते अहमदनगर धावणार एमएसआरटीसीची पहिली इलेक्ट्रिक बस ‘शिवाई’, वाचा सविस्तर…
पुणे ते अहमदनगर अशी पहिली इलेक्ट्रिक बस 1 जून रोजी धावणार आहे, बस अजून विभागात येणे बाकी आहे. त्याशिवाय विभागात 12 डेपोमध्ये एमएसआरटीसी स्थापना दिवस नियमित साजरा केला जाईल, असे एमएसआरटीसीने सांगितले.
पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसेस (MSRTC electric buses) लवकरच राज्यभर धावण्यास सुरुवात होणार आहे. राज्य परिवहन मंडळाची पहिली ई-बस 1 जून रोजी पुणे ते अहमदनगरला रवाना होईल, हा त्यांचा स्थापना दिवस देखील आहे. एकूणच राज्यात ई वाहनांचा वापर हळूहळू वाढण्यास सुरूवात झाली आहे. त्यानुसार पेट्रोल डिझेलवर मुख्यत: धावणाऱ्या एसएसआरटीसीच्या बसच्या ताफ्यात आता अधिकाधिक इलेक्ट्रिक बसेस समाविष्ट होणार आहेत. एसटी महामंडळाच्या ताफ्यात सप्टेंबर 2019मध्ये प्रथम इलेक्ट्रिक बस दाखल झाली. प्रदुषणाविना चालणाऱ्या या बस अधिक सुरक्षित आणि चांगला प्रवास अनुभव प्रवाशांना देणार आहेत. शिवाई (Shivai) नावाच्या या इलेक्ट्रिक बसेस टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात, जून-जुलैपर्यंत एमएसआरटीसीच्या ताफ्यात 150 ई-बस समाविष्ट होतील. एमएसआरटीसी केंद्र सरकारच्या फास्टर अॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रीड अँड इलेक्ट्रिक व्हेइकल्स (FAME) योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्याने 1,000 इलेक्ट्रिक बस आणि 2,000 CNG बसेस मिळवणार आहे.
तयारी सुरू
आम्हाला अद्याप 1 जूनच्या कार्यक्रमाबद्दल अधिकृत परिपत्रक किंवा सूचना मिळालेल्या नाहीत, परंतु मुख्य कार्यालयातून जाहीर केल्यानुसार आम्ही त्याची तयारी सुरू केली आहे. पुणे ते अहमदनगर अशी पहिली इलेक्ट्रिक बस 1 जून रोजी धावणार आहे, बस अजून विभागात येणे बाकी आहे. त्याशिवाय विभागात 12 डेपोमध्ये एमएसआरटीसी स्थापना दिवस नियमित साजरा केला जाईल, असे एमएसआरटीसीचे पुणे विभागीय नियंत्रक रमाकांत गायकवाड म्हणाले आहेत. तर पुणे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसेस लवकरच राज्यभर धावण्यास सुरुवात होणार आहेत.
1948 रोजी झाली स्थापना
1 जून 1948 रोजी पुणे ते अहमदनगर अशी पहिली बस धावल्याने एसएसआरटीसीची स्थापना झाली. तेव्हापासून, संस्थेची राज्यभर वाढ झाली आहे आणि सध्या महाराष्ट्रातील 248 डेपोमध्ये जवळपास एक लाख कर्मचारी कार्यरत आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. तर प्रवाशांनाही या बसेसची उत्सुकता असेल. एकीकडे सार्वजनिक वाहतूक सेवा पीएमपीएमएलनेही इलेक्ट्रित वाहनांना पसंती देत आपल्या ताफ्यात त्यांची संख्या वाढवली आहे. तर दुसरीकडे एमएसआरटीसीनेही इलेक्ट्रिक बसेस आपल्या ताफ्यात घेण्यास सुरुवात केली आहे.