Pune crime : तिकीट काढलं कोलकात्याचं, रवानगी थेट तुरुंगात! महागड्या सायकल चोरणाऱ्यांना पुण्यातील स्वारगेट पोलिसांचा हिसका
महागड्या सायकल चोरणारे दोन चोरटे पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police) या दोन चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल 35 सायकली (Cycles) पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
पुणे : महागड्या सायकल चोरणारे दोन चोरटे पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police) या दोन चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल 35 सायकली (Cycles) पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. परराज्यातील हे दोन चोरटे असून मौजमजेसाठी ते चोऱ्या करत असल्याचे उघड झाले आहे. महागड्या सायकली हे चोरटे चोरायचे आणि किरकोळ किंमतीला विकायचे. त्यातून मिळालेल्या पैशांतून ते मौज करायचे. विशेष म्हणजे हे चोर कोलकाता (Kolkata) येथून विमानाने पुण्याला येत आणि सायकली चोरत असत. स्वारगेट पोलिसांकडे सायकल चोरीच्या तक्रारी दाखल झाल्यानंतर त्याचा गांभीर्याने तपास करण्यात आला आणि या चोरट्यांना अटक करण्यात आली. त्यांनी परतीचे कोलकात्याचे तिकीटही काढले होते, मात्र त्याआधीच त्यांना जेलची हवा खावी लागली आहे.
तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कारवाई
कोलकाता येथील हे दोन चोरटे विमानाने पुण्यात यायचे. साधारण एक लाख किंवा तशाच महागड्या सायकल ते चोरी करत असत. चोरी केलेल्या सायकली विकायच्या आणि मिळालेल्या पैशांतून चैन करायची त्यांची सवय होती. नंतर ते परत कोलकात्याला जायचे. अलिकडच्या काळात सायकली चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. पोलिसांकडे याबाबत तक्रारीही येत होत्या. त्यानंतर पोलिसांनी याचा शोध घेतला असता त्यांना ताब्यात घेण्यात आले.