Pune fire : पुणे स्टेशनच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आग, स्टॉल्स जळून खाक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची आज जयंती त्यातच एक दुर्घटना पुण्यात घडली आहे. पुणे स्टेशन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असणारी दुकाने आणि होर्डिंग्सना आग (Fire) लागल्याचा प्रकार सकाळी घडला.
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची आज जयंती त्यातच एक दुर्घटना पुण्यात घडली आहे. पुणे स्टेशन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असणारी दुकाने आणि होर्डिंग्सना आग (Fire) लागल्याचा प्रकार सकाळी घडला. प्राथमिक माहितीनुसार गॅसगळती झाल्याने हा प्रकार घडला असावा, असा अंदाज आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल (Firebrigade) घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. गर्दीच्या वेळी हा प्रकार घडला नाही. आज गर्दी असल्याने परिसरात स्टॉल्सही लावण्यात आले आहेत. मात्र या आगीत ही दुकाने मात्र जळून खाक झाली आहेत. आग लागल्यानंतर एकच गोंधळ उडाला. पळापळ झाली. आग विझवण्याचे प्रयत्न स्थानिकांनी केले. अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.
गॅसची गळती
पुणे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात आज गर्दी आहे. अनेक स्टॉल्सही लावण्यात आले. तर खाद्यपदार्थ तयार करण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी गॅसची गळती झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आग पसरली. अग्निशामक दलाला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र त्यादरम्यान अनेक दुकाने, स्टॉल्स जळून खाक झाली होती.