Pune Accident : रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला धडकली कार, पुणे-बंगळुरू महामार्गावर अपघात; पाच जणांचा मृत्यू
सर्व मृतांना अनेक गंभीर दुखापती झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. पुणे आणि जयसिंगपूर येथील मृतांच्या कुटुंबीयांना पोलीस पथकाने तत्काळ माहिती दिली. पोलिसांनी सांगितले, की कंटेनर चालकाने आपला कंटेनर नैसर्गिक विधीसाठी काही वेळ महामार्गावर थांबवला होता, असे तपासात स्पष्ट झाले आहे.
पुणे : रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला कार धडकून झालेल्या अपघातात (Accident) पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात शनिवारी दुपारी पुणे-बंगळुरू महामार्गावर (Pune-Bengaluru highway) एका थांबलेल्या कंटेनर ट्रकला कारने धडक दिली. यात तीन मुलांसह एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. वाकड येथील रहिवासी अरिंजय अण्णासाहेब शिरोटे (35), भावाची पत्नी स्मिता अभिनंदन शिरोटे (38) आणि तिची तीन मुले पूर्वा (14), सुनीषा (9) आणि विरेन (4) अशी मृतांची नावे आहेत. शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास मर्चंट नेव्हीमध्ये (Merchant Navy) काम करणारा अरिंजय हा इतरांना सोडण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे जात असताना ही दुर्घटना घडली. आई आणि तीन मुले सुटी घालवण्यासाठी पुण्यातील वाकड येथील शिरोटे यांच्या घरी आले होते. या अपघातामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दुपारी अडीचच्या सुमारास अपघात
सांगली जिल्ह्यातील कासेगाव पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले, की हे कुटुंब सकाळी वाकड येथून निघाले. वाटेत त्यांनी कराड येथे जेवण केले. काही वेळात पोहोचू, असे त्यांनी जयसिंगपूर येथील इतर कुटुंबीयांना सांगितले. दुपारी 2.30च्या सुमारास कासेगाव गावाजवळ त्यांची कार रस्त्यावर थांबलेल्या कंटेनरवर धडकली. ही धडक इतकी जोरदार होती, की कारचा चक्काचूर झाला. सर्व जखमींना जवळच्या इस्लामपूर शहरातील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
महामार्गावर वाहतूककोंडी
सर्व मृतांना अनेक गंभीर दुखापती झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. पुणे आणि जयसिंगपूर येथील मृतांच्या कुटुंबीयांना पोलीस पथकाने तत्काळ माहिती दिली. पोलिसांनी सांगितले, की कंटेनर चालकाने आपला कंटेनर नैसर्गिक विधीसाठी काही वेळ महामार्गावर थांबवला होता, असे तपासात स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावर सुमारे तासभर वाहतूककोंडी झाली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.