Pune ATS : काश्मीरमधल्या अतिरेकी संघटनांकडून फंडिंग? पुण्याच्या दापोडीतून एटीएसनं केली तरुणाला अटक
राज्यात घातपाती कृत्यांसाठी काश्मीरमधील अतिरेकी संघटनेकडून या तरुणाला पैसे पुरवण्यात आले, असा आरोप त्याच्यावर आहे. तरुणाला पैसे नेमके का पाठवण्यात आले? तो या पैशांचे काय करणार होता? हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, दहशतवादी कृत्यांसाठीच हे फंडिंग करण्यात आल्याचा एटीएसचा आरोप आहे.
पुणे : दहशतवादविरोधी पथकाकडून (Anti Terrorism Squad) जुनेद मोहम्मद या तरुणाला दापोडी परिसरातून अटक करण्यात आली आहे. काश्मीरमधील अतिरेकी संघटनेकडून फंडिंग झाल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याला पुणे न्यायालयात (Pune court) दुपारी हजर केले जाणार आहे. त्यावेळी अधिक तपासासाठी दहशतवादविरोधी पथक म्हणजेच एटीएस त्याची कोठडी मागण्याची शक्यता आहे. हा तरूण काश्मीरमधील गझवाते-अल-हिंद तसेच लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. पुणे दहशतवादविरोधी पथकाकडून या तरुणाला आता अटक करण्यात आली आहे. पुणे एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, गझवाते अल हिंद या काश्मीरमधील अतिरेकी संघटनेने (Terrorist organization) महिनाभरापूर्वीच या तरुणाच्या बँक खात्यात दहा हजार रुपये जमा केले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो या संघटनेच्या संपर्कात आला होता.
आरोपीची कोठडी मागणार एटीएस?
राज्यात घातपाती कृत्यांसाठी काश्मीरमधील अतिरेकी संघटनेकडून या तरुणाला पैसे पुरवण्यात आले, असा आरोप त्याच्यावर आहे. तरुणाला पैसे नेमके का पाठवण्यात आले? तो या पैशांचे काय करणार होता? हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, दहशतवादी कृत्यांसाठीच हे फंडिंग करण्यात आल्याचा एटीएसचा आरोप आहे. आरोपीला पुणे न्यायालयात दुपारी हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी एटीएसकडून त्याची कोठडी मागण्यात येणार आहे. जुनैद हा मुळचा बुलडाणा जिल्ह्यातील खामगावचा रहिवासी असून तो मागील दीड वर्षांपासून पुण्यात राहत होता. त्याचे शिक्षण मदरशात झाले आहे.
आरोपीचे वय केवळ 18 वर्षे
अटक केलेला आरोपी जुनेद मोहम्मद हा अवघा 18 वर्षांचा असून तो बेरोजगार असल्याचे समोर येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो जम्मू काश्मीरमधील दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला होता. त्यानंतर राज्यात घातपाती कारवायांसाठी काश्मीरमधीलच एका संघटनेने त्याला महिनाभरापूर्वी 10 हजार रुपये पाठवले होते. त्याच्या बँक खात्यात हे पैसे टाकण्यात आले होते. काही दिवसांपासून एटीएस आरोपीच्या मागावर होते. अखेर त्याच्या आज मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.