PMC election 2022 : प्रारूप मतदार यादीसाठी मुदतवाढ द्या, पुणे महापालिका आयुक्तांची निवडणूक आयोगाकडे मागणी
सर्व हरकतींवर कार्यवाही करण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे 9 जुलैपर्यंत हे काम पूर्ण होणार नाही, असे दिसते. यासाठी 23 जुलैपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आयुक्त विक्रम कुमार यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांकडे केली आहे.
पुणे : प्रारूप मतदार यादीसाठी (Voter list) मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी पुणे महापालिकेने निवडणूक आयोगकडे केली आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी (PMC election 2022) तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर तब्बल 4 हजार 273 हरकती आल्या आहेत. त्यांची तपासणी करण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी लागणार आहे. त्यामुळे 9 जुलैपर्यंत अंतिम मतदार यादी तयार करणे कठीण आहे. त्यामुळे महापालिकेने ही मुदत 23 जुलैपर्यंत वाढवून द्यावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे (Election commission) करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने विधानसभेसाठी तयार केलेल्या मतदार यादीची फोड करून तीनच्या प्रभागानुसार प्रारूप मतदार यादी तयार केली आहे. पण ही मतदार यादी तयार करत असताना मोठ्या प्रमाणात घोळ झाला आहे. बहुतांश सर्व प्रभागातील अनेक मतदार दुसऱ्या प्रभागात गेले आहेत. त्यामुळे आपले मतदार दुसरीकडे गेल्याने इच्छुकांमध्येही घालमेल आहे.
अनेक बोगस मतदार?
प्रारूप यादी तयार करत असताना क्षेत्रीय कार्यालयावर राजकीय पदाधिकाऱ्यांशी संगनमत करून त्यांनी दिलेली नावे यादीत टाकली आहेत. अनेक बोगस मतदार त्यात टाकल्याने त्याचा फटका निवडणुकीत बसणार आहे, असा आरोप झाला होता. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी आणि हरकती नोंदविण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. महापालिकेने तीन जुलैच्या पुढे मुदतवाढ दिलेली नसली, तरी आलेल्या सर्व हरकतींचा निपटारा करताना प्रशासनाच्या नाकीनऊ येणार आहे. प्रारूप यादीवर हरकती नोंदविण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 1 हजार 747 हरकती नोंदविण्यात आल्या. यासह एकूण हरकतींची संख्या 4 हजार 273 इतकी आहे. तर राजकीय पक्षांकडून 562 हरकती आलेल्या आहेत.
प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी
या सर्व हरकतींवर कार्यवाही करण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे 9 जुलैपर्यंत हे काम पूर्ण होणार नाही, असे दिसते. यासाठी 23 जुलैपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आयुक्त विक्रम कुमार यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांकडे केली आहे. सध्या प्रत्येक प्रभागात 25 कर्मचाऱ्यांचे पथक या कामासाठी नियुक्त करण्यात आले आहे.