Mumbai-Pune : मुंबई-पुणे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; प्रवासाचा 25 मिनिटांचा वेळ वाचणार, वाचा सविस्तर…
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील 13.3 किलोमीटरच्या राहिलेल्या मिसिंग लिंकचे काम एमएसआरडीसीकडून हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे बोर घाटातील सहा किलोमीटर वळणाच्या मार्गाला हा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.
पुणे : मुंबई-पुणे (Mumbai-Pune) अंतर आता आणखी कमी होणार आहे. प्रवासाचा वेळ वाचणार आहे. पुणे-मुंबईचे अंतर सहा किलोमीटरने कमी होणार असून त्यामुळे वेळेत 25 मिनिटांची बचत होणार आहे. या दोन्ही शहरातील अंतर कमी करणाऱ्या द्रुतगती महामार्गावरील लोणावळा ते खोपोली एक्झिट या भागातील पर्यायी रस्त्यासाठी तयार करण्यात येण्यात असलेल्या दोन बोगद्यांपैकी (Tunnel) एका बोगद्याचे काम जवळपास सत्तर टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. डिसेंबर अखेरपर्यंत बोगद्यांचे काम शंभर टक्के पूर्ण करण्याचे लक्ष्य महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ठेवण्यात आले आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे दोन्ही कॉरिडॉरच देखभाल, दुरुस्तीसाठी बीओटी (बांधा, वापरा व हस्तांतरित करा) या तत्त्वावर 30 वर्षाच्या कालावधीसाठी राज्य सरकारने 1999पासून एमएसआरडीसीकडे (MSRDC) हस्तांतरीत केला आहे.
दरडींमुळे डोंगरालगतची वाहतूक ठेवावी लागते बंद
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र मिळतात व पुढे खंडाळा एक्झिट येथे वेगळे होतात. अडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिट ही रुंदी सहापदरी असून या भागात 10 पदरी वाहतूक येऊन मिळते. तसेच भागामध्ये घाट व चढ उताराचे प्रमाण जास्त असून पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रकार वारंवार होत असतात. त्यामुळे मुंबईकडे येणारी डोंगरालगतची एक लेन ही पावसाळ्यत बंद ठेवावी लागते. या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील 13.3 किलोमीटरच्या राहिलेल्या मिसिंग लिंकचे काम एमएसआरडीसीकडून हाती घेण्यात आले आहे.
आठ पदरी नवा रस्ता
या प्रकल्पामुळे बोर घाटातील सहा किलोमीटर वळणाच्या मार्गाला हा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. लोणावळ्यापासून सुरू होणारा हा बोगदा पुढे खोपोली एक्झिट इथे संपणार आहे. प्रकल्पातंर्गत दोन बोगदे व दोन व्हाया डक्टसह आठ पदरी नवीन रस्ता बांधण्याचे काम सुरू आहे. पुण्याकडून मुंबईला जाताना असणारा बोगदा सुमारे 9 किलोमीटर लांबीचा असणार आहे. यातील साडेसहा किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे. या बोगद्याची रुंदी 23.5 मीटर इतकी आहे.
बोगद्याचे काम लवकरच होणार पूर्ण
मुंबईकडून पुण्याकडे येताना याच भागात एक किलोमीटर लांबीचा एक बोगदा आहे. त्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. पुण्याकडून मुंबईकडे जाताना सर्वांत मोठ्या लांबीचा म्हणजे नऊ किलोमीटर लांबीचा बोगदा आहे. त्याचे काम जवळपास 72 टक्के पूर्ण झाले आहे. याशिवाय दोन दरीपूल आहेत. मिसिंग लिंक प्रकल्पामुळे पुणे-मुंबई हे अंतर सहा किलोमीटरने कमी होणार आहे. यामुळे 25 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. आता हे काम डिसेंबर 2023पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.