एप्रिल महिन्यात असे झाल्यावर प्रश्न पडणारच? हे पुणे आहे की काश्मीर
हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला होता. पुणे शहराला ऑरेंज अलर्ट दिले होते. त्याप्रमाणे शनिवारी गारपीट झाली. या गारपीटमुळे रस्त्यांवर गारांचा खच जमा झाला होता. यामुळे हे पुणे आहे की काश्मीर असा प्रश्न पडला होता.
पुणे : पुणे शहरात शनिवारी अवकाळी पावसाने चांगलंच झोडपलं आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार झालेल्या या पावसामुळे पुणेकरांची एकच दाणादाण उडाली. पुणे शहरातील अनेक भागात गारांचा पाऊस पडला. पुण्यातील कात्रज घाटात पडलेल्या गारांचा पावसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मिनी काश्मीर म्हणून चांगलाच व्हायरल होत आहे. शनिवारी दुपारी झालेल्या या गारांच्या पावसामुळे पुण्यात नागरिकांचा गोंधळ उडाला तर पुण्यातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती.
नागरिकांचा गोंधळ
हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला होता. परंतु पुणेकर उन्हाळा असल्यामुळे छत्री, रेनकोट असे कोणतेही साहित्य घेऊन घराबाहेर पडले नव्हते. मग शनिवारी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. त्यावेळी नागरिकांचा गोंधळ उडाला. त्यांनी आडोसा शोधत आसरा घेतला. या पावसाने प्रचंड तारांबळ केल्याचे पाहायला मिळाले. नागरिक पावसाने साचलेल्या पाण्यातून वाहतूक कोंडीतून मार्ग काढत घरी जात असल्याचे दिसून आले.
आंबेगाव तालुक्यात मुसळधार
आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव – खडकी येथे गारांच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह गारांचा मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी झाल्याने शेतकऱ्याची मोठी आर्थिक हानी झाली आहे. या परिसरात कांदा काढणीची लगबग सुरू असल्याने गारांमुळे कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. साठवणुकीसाठी वखारीत ठेवलेला कांदा पावसाच्या पाण्यामुळे भिजल्याने आणि शेतातील बागायती तसेच चारापिके उध्वस्त झाले आहे.
आयएमडीचा अंदाज
पुणे शहरासह उपनगरांमध्ये तीन दिवस पावसाचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. शहरात दिवसभर ऊन तर संध्याकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण असणार आहे. यामुळे अनेकांना आरोग्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. दोन दिवस पुणे शहराला हवामान खात्याचा येलो अलर्ट दिली आहे.
तापमान ४० अंशावर
पाऊस पडत असताना पुणे शहरातील उष्णतेचा पारा देखील वाढला आहे. तापमान वाढून ४० अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. दुपारच्या सुमारास शहरात तापमानाचा पारा वाढणार आहे. यामुळे पुणेकरांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
Pune Tmax today …Is "P 40" becoming a new normal please !! pic.twitter.com/cQyJifJK5T
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 15, 2023
जळगावात पाऊस
मुक्ताईनगर ,भुसावळ ,रावेर ,बोदवड तालुक्यात अवकाळी पाऊस सलग आठ दिवसांपासून नागरिक कडाक्याच्या उष्णतेपासून हैरान झाले आहेत. शनिवारी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. परंतु शेतकऱ्यांचे नुकसान झाले.