Pune Hapus : हापूस आला टप्प्यात..! पुण्याच्या मार्केटयार्डात आवक वाढली; अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर दरही कमी
गेल्या आठवडाभरात कोकण पट्ट्यात झालेल्या पावसामुळे मार्केट यार्डात हापूस आंब्याच्या 10 हजारांहून अधिक पेट्यांची आवक झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे मार्केट यार्डात हापूस आंब्याच्या साठ्याची चांगली आवक होत असून, गेल्या आठवडाभरातील पावसाचा हा परिणाम आहे.
पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अनपेक्षित पावसामुळे कोकण पट्ट्यातील शेतकऱ्यांनी पुणे मार्केट यार्डात (Pune Marketyard) आंब्याचा साठा पाठवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांत गुलटेकडी येथे आंब्याच्या 10 हजार पेट्यांची आवक झाली आहे. पुरवठ्यात वाढ झाल्यामुळे हापूस (Hapus) आंब्याचे दर किमान 25 टक्क्यांनी कमी झाले आहेत. तसेच, अक्षय्य तृतीया सण 3 मेला आहे. बहुतेक लोक आंबे खाण्यास यानंतरच सुरुवात करतात. आंब्याची विक्रीही यावेळी वाढत असते. कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) पुणे नुसार, जानेवारी महिन्यात हापूस आंब्याची पहिली पेटी पुणे मार्केट यार्डात आली आणि तेव्हापासून मागील वर्षांच्या तुलनेत पुरवठा कमी झाला. आतापर्यंत कोकण आणि जिल्ह्याच्या इतर भागातून आंब्याचा पुरवठा एका आठवड्यात सुमारे 4,000 ते 5,000 पेट्या होत असे.
आवक चांगली
गेल्या आठवडाभरात कोकण पट्ट्यात झालेल्या पावसामुळे मार्केट यार्डात हापूस आंब्याच्या 10 हजारांहून अधिक पेट्यांची आवक झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे मार्केट यार्डात हापूस आंब्याच्या साठ्याची चांगली आवक होत असून, गेल्या आठवडाभरातील पावसाचा हा परिणाम आहे. त्यामुळे आंब्याचे दर कमी झाले असून अक्षय्य तृतीया मुहूर्ताच्या आशेने लोकही मोठ्या प्रमाणात आंब्याची खरेदी करत आहेत, असे गुलटेकडी येथील पुणे मार्केट यार्डमधील आंबा व्यापारी युवराज कांची यांनी सांगितले.
आकारानुसार दर
रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याचे दर फळांच्या आकारानुसार चार ते सहा डझन पेट्यांसाठी 2,500 ते 3,000च्या दरम्यान आहेत. कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू यांसारख्या दक्षिणेकडील राज्यांतून येणाऱ्या आंब्याचे दर प्रति डझन सुमारे 600 ते 1,000 इतके आहेत.