Pune rain : पुणे जिल्ह्यात सुरूय सुखावणारा पाऊस, कुठे निसर्गाचं विलोभनीय रूप तर कुठे दरडींमुळे रस्ते बंद, अपडेट्स इथे वाचा…
सध्या सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरीही सुखावला आहे. शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर या तालुक्यांमध्येदेखील रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू असून संततधार पावसामुळे शिवनेरी किल्ला (Shivneri fort) धुक्यात वेढला गेला आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यात आता पावसाने जोर (Heavy rain) धरला आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुखावणारा असा पाऊस सुरू आहे. लोणावळ्यात तर गेल्या 24 तासांत 166 मिमी पावसाची नोंद झाली आहे. लोणावळा (Lonavala) परिसरात यावर्षी आतापर्यंत 581 मिमी पावसाची नोंद झाली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत फारच कमी आहे. गेल्या वर्षी याचवेळेस एकूण 1 हजार 105 मिमी पावसाची नोंद झाली होती. दरम्यान सध्या सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरीही सुखावला आहे. शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर या तालुक्यांमध्येदेखील रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू असून संततधार पावसामुळे शिवनेरी किल्ला (Shivneri fort) धुक्यात वेढला गेला आहे. हिरवागार निसर्ग, धुक्यांनी वेढलेला परिसर आणि धो धो पाऊस यामुळे शिवनेरीचे वैभव अतिशय विलोभनीय असेच दिसत आहे. पर्यटकांची पावले या परिसरात वळत आहेत.
वरंध घाट बंद
महाड मार्गावरील वरंध घाट सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे घाटात अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. त्याचबरोबर घाटात दरड, माती कोसळत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मागच्या आठवड्यात हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा अलर्ट मिळाल्यानंतर जड वाहनांसाठी हा घाट बंद करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला होता, मात्र सततच्या पावसामुळे घाट रस्ता खचत असल्याने आणि जागोजागी दरड कोसळत असल्याने आता हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
पुणे-नाशिक महामार्गावरील प्रवास धोकादायक
पुणे-नाशिक महामार्गावरील नव्यानेच तयार केलेल्या खेड घाटात बऱ्याच ठिकाणी धोकादायक दरडी दिसून येत असल्याने प्रवास धोकादायक बनला आहे. या रस्त्याचे काम काही ठिकाणी दुरुस्ती करून दरड कोसळण्याचा धोका कमी करण्यात आला असला तरी अद्यापही अनेक ठिकाणी हा धोका कायम आहे. काही ठिकाणी दरड कोसळून अपघात होण्याची भीती आहे.
कात्रज जुना बोगदा परिसरात दरडींची भीती
कात्रज जुना बोगदा येथे दरड कोसळल्याची घटना घडली होती. पुणे मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने तातडीने तसेच महापालिका कर्मचारी आणि पाटबंधारे विभाग जेसीबीची मदत घेऊन घटनास्थळी पोहोचले. सद्यस्थितीत रस्त्यावर आलेले मोठे दगड बाजूला करण्याचे काम पूर्ण केले असून तरी नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.