Pune rain : पुणे परिसराला मुसळधार पावसानं झोडपलं, सासवडमध्ये पहिल्यांदाच मोसमातली अतिवृष्टी; पीकांचं नुकसान
कोकण, गोवा, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला होता. राज्यातील विविध जिल्ह्यांबरोबरच मुंबईतदेखील 7 आणि 8 ऑगस्टला मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसाने (Pune rain) हजेरी लावली. पुरंदर तालुक्यातील सासवड शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस बरसला. सुमारे 85 मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच याठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतामध्ये, रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळाले. कमी वेळेत अधिक पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. सासवडच्या (Saswad) आचार्य अत्रे वेधशाळेमध्ये हा पाऊस 85 मि. मी. झाल्याचे व्यवस्थापक नितीन यादव यांनी सांगितले आहे. पुढील 48 तासांत राज्यात मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय होणार असून 5 ते 11 ऑगस्ट दरम्यान राज्यात सर्वच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती. त्यानुसार काल संध्याकाळपासून विविध जिल्ह्यांना पावसाने झोडपले आहे.
खडकवासला परिसरात पाऊस
खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मागील शनिवारपासून बुधवारी संध्याकाळपर्यंक पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार गुरुवारी संध्याकाळनंतर या धरणसाखळी परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. येथील चार धरणांची एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता 29.15 अब्ज घनफूट (टीएमसी) आहे. 4 ऑगस्टपर्यंत या चारही धरणांमध्ये उपयुक्त पाणीसाठा 21.18 टीएमसी झाला आहे.
मुसळधार पावसाचा इशारा
कोकण, गोवा, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला होता. राज्यातील विविध जिल्ह्यांबरोबरच मुंबईतदेखील 7 आणि 8 ऑगस्टला मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा मान्सूनचा जोरदार पाऊस होणार असल्याचे सांगण्यात आले. तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने विदर्भ मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शेतीचे नुकसान
मागील दहा-अकरा दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे राज्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी पुन्हा शेतीच्या कामात गुंतला होता. मात्र पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेती पिकांच्या नुकसानीत भर पडली आहे. तर येत्या काही तासांत आणि दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा आधीच हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.