‘स्मार्ट सिटी’ पाण्यात का गेली? पुण्यातील हाहाकाराची कारणे काय? प्रश्नांचा पाऊस कायम

गुरुवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे शहरात हाहाकार पहायला मिळाला. विविध ठिकाणी लोक अडकले, वाहने पाण्यात बुडाली, वाहतूक ठप्प झाली आणि पुण्यातील जनजीवन विस्कळीत झालं. यामागची नेमकी कारणं काय आहेत, याविषयीचा आढावा घेऊयात..

'स्मार्ट सिटी' पाण्यात का गेली? पुण्यातील हाहाकाराची कारणे काय? प्रश्नांचा पाऊस कायम
'स्मार्ट सिटी' पाण्यात का गेली? Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Jul 26, 2024 | 1:22 PM

यंत्रणा सक्षम नसल्या की अख्ख्या शहराची कशी वाट लागते, हे सामान्य पुणेकरांनी गुरूवारी अनुभवलं. विकास प्रकल्प हे सर्वसामान्य माणसासाठी केले जात असल्याचा आव आणला जातो. पण निसर्गाला ओरबाडून त्याच्याच उरावर उभ्या राहत असलेल्या विकास प्रकल्पांमुळे सामान्य माणसाचं जगणं जिकिरीचं झालं आहे. बुधवारी पावसाने संततधार स्वरूपात हजेरी लावली होती. हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट असल्याने एवढ्या पावसाचा अंदाज नव्हता. त्यामुळे बुधवारी दुपारी खडकवासला धरणातून विसर्ग वाढविण्यात आला होता. पण जसजसा पावसाने दुपारनंतर जोर धरला, तसतशी नदीकाठच्या हाऊसिंग सोसायटीतील रहिवाशांच्या मनात धडकी भरू लागली. शहरातील सिमेंटचे रस्ते, बुजवलेले किंवा वळवलेले नैसर्गिक प्रवाह, अतिक्रमणं, धरणातून पाणी सोडण्याबाबत समन्वयाचा अभाव, सांडपाणी वाहिन्यांची कामं पूर्ण केल्याचा पालिकेचा खोटा दावा, हवामान विभागाचे सतत चुकणारे इशारे यांमुळे गुरुवारी सर्वसामान्य पुणेकरांना ज्या परिस्थितींना सामोरं जावं लागलं, त्यांची उत्तरं मागायची तरी कुणाकडे? गुरुवारी संध्याकाळपासून पावसाचा जोर ओसरला असला तरी सर्वसामान्य ‘स्मार्ट सिटी’करांच्या मनात प्रश्नांचा पाऊस कायम आहे.

‘स्मार्ट सिटी’मधील पुराची संभाव्य कारणे काय?

गुरुवारी दिवसभर जोरदार पाऊस झाला. कमी वेळात जास्त पाऊस पडला तरी शहरातील पावसाळी वाहिन्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता चांगली असली की रस्त्यांवर पाणी साचून राहत नाही. शिवाय सिमेंटचे रस्ते ज्या-ज्या भागात असतात, तिथे पाणी साचून राहण्याचं प्रमाण जास्त असतं. सिमेंटच्या रस्त्यांमुळे रस्त्यावरील पाण्याचा निचरा लवकर होत नाही आणि ते जमिनीतही मुरत नाही. अनेक ओढे, नाले बुजवलेले असतात किंवा त्यांचे प्रवाह वळविण्यात आलेले असतात. काँक्रिटीकरणामुळे नैसर्गिक प्रवाहांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे पावसाचं पाणी वाहून जाण्याऐवजी ते रस्त्यांवर पसरतं. शिवाय सांडपाणी वाहून नेण्याच्या पाईपलाइन्समध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक अडकून पडल्यास पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होतो. पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी पावसाळी वाहिन्या साफ करणं, नालेसफाई करणं आवश्यक असतं. मात्र गुरूवारी शहरातील परिस्थिती पाहता हे काम महापालिकेनं केलं का, असा प्रश्न निर्माण होतो. पूररेषेच्या परिसरात बांधकाम करण्यास मनाई आहे. मात्र शहरात ज्या ज्या ठिकाणी पाणी भरलं, ते बहुतांश भाग पूररेषेतील बांधकामाचे असल्याचं कळतंय. अशा बांधकामांना परवानगी कशी मिळते, हा प्रश्न उपस्थित होतो.

शहरातील नागरिकांना पुराचा फटका

शहरासोबतच धरण परिसरातही जोरदार पाऊस झाल्याने गुरुवारी पहाटे तीन वाजता खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे बालेवाडी पूल, मुळा नदीवरील पूल, संगम रस्त्यावरील पूल, होळकर पूल, संगमवाडी पूल, हडपसर-मुंढवा रस्त्यावरील पूल, येरवडा शांतीनगर इथलं पूल, निंबजनगर इथलं पूल पाण्याखाली गेलं. तसंच अनेक सोसायटींमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. सिंहगड रस्ता परिसराला याचा सर्वाधिक फटका बसला. सोसायट्यांच्या आवारात, नदीपात्राजवळच्या बैठ्या घरात पाणी शिरलं होतं. हजारो नागरिकांना याचा फटका बसला होता. लष्कर आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) तुकडीला पाचारण करावं लागलं होतं. पुरात अडकलेल्या नागरिकांचं बोटींच्या सहाय्याने जवळच्या शाळांमध्ये स्थलांतर करण्यात आलं होतं. गुरुवारी संध्याकाळपर्यंत एकूण 4 हजार 175 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं होतं. या सर्व नागरिकांच्या भोजनाची सोय महापालिकेकडून करण्यात आली होती. शहराबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचीही पावसाने दैना केली होती. दरडी कोसळणं, दरडींमुळे घाट रस्ते बंद पडणं अशा घटना घडल्या.

हे सुद्धा वाचा

पूररेषेतील बांधकामं, अतिक्रमणं

खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने पाणीसाठा 75 टक्क्यांवर पोहोचला होता. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक विसर्ग गुरूवारी करण्यात आला. धरणातून सोडण्यात आलेल्या 40 हजार क्युसेक पाण्याने पुणे शहराची वाताहात झाली. नदीपात्रातील अनेक सोसायट्यांमध्ये पुराचं पाणी शिरलं. गेल्या काही वर्षांत विविध प्रकारच्या अतिक्रमणांमुळे नदीची वहन क्षमता कमी झाली आहे. नदीपात्रातील मेट्रो प्रोजेक्टचं काम आणि सांडपाणी प्रकल्पांमुळे नदीचा क्रॉस सेक्शनही कमी झाला आहे.

पूररेषा म्हणजे काय?

पूररेषा ही जमिनीवरची एक काल्पनिक रेषा असते. ही रेषा पुराच्या वेळी पाण्याची धार कुठपर्यंत जाऊ शकते, ते दर्शवते. पर्जन्यमान, माती, वनस्पती, नदीची परिस्थिती आणि प्रवाह या सर्व गोष्टींचं विश्लेषण करून ही पूररेषा ठरवली जाते.

नदीची वहन क्षमता झाली कमी

1997 मध्ये 90 हजार क्युसेक या वेगाने पाणी सोडण्यात आल्यानंतर जी पातळी पाण्याने गाठली होती, तीच पातळी 2011 मध्ये 67 हजार 212 क्युसेक वेगाने पाणी सोडल्यावर गाठली गेली. तर 2019 मध्ये 45 हजार 474 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आल्यानंतर शहरात हाहाकार उडाला होता. आता 40 हजार क्युसेक पाण्याने पुणे शहराची वाताहात झाली. या उदाहरणांवरून नदीची वहन क्षमता कमी झाल्याचं स्पष्ट होत आहे. त्याचप्रमाणे इतर काही कारणांमुळे नदीपात्र अरुंद होत आहे.

पूररेषेतील बांधकामं

महापालिकेनं 2016 ची पूररेषा ग्राह्य धरावी, असं जलसंपदा विभागाने स्पष्ट केलंय. मात्र महापालिकेनं 2011 ची पूररेषा गृहीत धरून नदीपात्रात बांधकामांना परवानगी दिली. निळ्या पूररेषेच्या निषिद्ध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भराव टाकून बांधकामं केली जात आहेत. त्यामुळे पूरपातळीत वाढ होत आहे. नदी पात्रालगतच्या गृहप्रकल्पांना याचा मोठा फटका बसतोय.

हवामान विभागाचे सतत चुकणारे इशारे

मुंबई आणि उपनगरांच्या वेगवेगळ्या भागात गुरुवारी सकाळी मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. पण प्रत्यक्षात बुधवारी रात्रीपासूनच मुंबईकरांना कोसळधारांचा अनुभव आला. त्यानंतर शुक्रवारी सकाळपर्यंत अतिवृष्टीचा अंदाज जाहीर होताच पावसाचा जोर ओसरला. जून महिन्यात मोसम पाऊस दाखल झाल्यापासून हवामान विभागाने मुंबई संदर्भात दिलेले पावसाचे बहुतांश अंदाज आणि इशारे फोल ठरले. हवामान विभागाच्या या फसलेल्या इशाऱ्यांमुळे नागरिक आणि यंत्रणांची फसगत झाली. बुधवारी मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर गुरूवारी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज होता. प्रत्यक्षात पहाटेपासूनच मुंबई शहर आणि उपनगरात अतिमुसळधार पाऊस झाला. हवामान विभागाने गुरुवारसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला नसल्याने शाळांचीही तारांबळ उडाली.

प्रश्नांचा पाऊस कायम

गुरुवारी अनुभवलेल्या आणि पाहिलेल्या परिस्थितीनंतर पुणेकरांच्या मनात संपूर्ण व्यवस्थेविषयी अनेक प्रश्न उमटून गेले. नदीच्या पात्रात बांधकामांना परवानगी कशी मिळते? पुररेषा निश्चित असेल, तर नदी केवळ पात्रातून वाहिली, तरी पूर कसा येतो? नाल्यांची सफाई केल्याचे दावे करूनही रस्त्यांवर पाणीच पाणी कसं होतं? पावसाळा पूर्वीची सर्व कामं पूर्ण केल्याची ग्वाही देऊनही रस्ते खड्डेमय कसे होतात? नदीत कचरा टाकणाऱ्यांवर नक्की काय कारवाई होते? दर गुरुवारी तांत्रिक कामं करूनही पाऊस म्हटल्यावर लगेच वीज गायब कशी होते? सिमेंटच्या रस्त्यांमुळे पाण्याचा निचरा होण्यास, ते जमिनीत मुरण्यास अडथळे येत असूनही त्याला पर्यायी मार्गाचा विचार का केला जात नाही? असे आणि यांसारखे असंख्य प्रश्न पुणेकरांच्या मनात उपस्थित झाले. पण या प्रश्नांची उत्तरं मिळणार की नाही, हासुद्धा एक मोठा प्रश्नच आहे.

57 वर्षांनी नवा विक्रम

पुणे शहर आणि उपनगरांना झोडपून काढणाऱ्या पावसाने 57 वर्षांनंतर नवा विक्रम नोंदवला आहे. बुधवारी रात्री शिवाजीनगर इथं 114.1 मिलीमीटर पाऊस पडला. जुलैमधील एका दिवसात पडलेला हा तिसऱ्या क्रमांकाचा पाऊस ठरला. त्याआधी पुण्यात 27 जुलै 1967 रोजी 117.9 मिलीमीटर आणि 19 जुलै 1958 रोजी 130.4 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला होता.

ठाणे, कल्याण, बदलापूरमध्येही मुसळधार

ठाणे जिल्ह्यात बुधवार रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर गुरुवारी कायम होता. या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कल्याण, भिवंडी, अंबरनाथ आणि बदलापूर भागातील अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. अनेक रस्ते जलमय झाल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आलं होतं. ठाणे शहरातील वंदना थिएटर, मुख्य बाजारपेठ, गोखले रोड, कोपरी, कोर्ट नाका ते खारकर आळी या भागात पाणी साचलं होतं. त्याचबरोबर बाळकुम आणि पडवळनगर भागातील काही चाळींमध्येही पाणी शिरलं होतं. अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. डोंबिवली शहरातील सखल भागात आयरे, कोपर, निळजे लोढा हेवन भागात पुराचं पाणी शिरल्याने रहिवाशांचे हाल झाले. मुसळधार पावसामुळे उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे नदीकाठच्या अंबरनाथ, कल्याण, भिवंडी तालुक्यातील 22 गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे आज (26 जुलै) शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.