MPSC पास दर्शना पवार हिच्या मारेकऱ्यास पकडण्यासाठी पोलिसांनी कसा रचला सापळा
MPSC Darshana Pawar : दर्शना पवार हत्या प्रकरणात मुख्य आरोपीस गुरुवारी मुंबईत अटक करण्यात आली होती. त्यानंतर खुनाचे कारण समोर आले आहे. पोलिसांना त्याची सात दिवसांची कोठडी मिळाली आहे.
प्रदीप कापसे, पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत वनविभागात अधिकारी म्हणून नियुक्ती मिळालेल्या दर्शना पवार खूनप्रकरणाचा अखेर उलगडा झालाय. दर्शनासोबत असलेला तिचा मित्र राहुल हंडोरे यानेच तिचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने राहुल हंडोरे याला मुंबईतील अंधेरी स्टेशनहून अटक केलीय. त्यानंतर लग्नाला नकार दिल्यामुळे नैराश्यातून खून केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी राहुल याला न्यायालयात हजर केले. त्यानंतर त्याची पोलीस कोठडीची मागणी केली. पोलिसांची मागणी न्यायालयाने मान्य केली. राहुलला ७ दिवसांची पोलीस कोठडी दिल्यामुळे २९ जूनपर्यंत तो पोलीस कोठडीत असणार आहे.
राजगडावर ट्रेकला नेऊन केला घात
एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन वनअधिकारी झालेल्या दर्शनाचा पुण्यात सत्कार झाला. त्यानंतर आठच दिवसांत राजगड पायथ्याला तिचा मृतदेह मिळाला. या सत्कारानंतर मित्र असलेला राहुल हंडोरे याच्यासोबत दर्शना राजगड ट्रेकवर गेली. राजगड पायथ्याला असलेल्या सीसीटीव्हीमध्ये राहुल अन् दर्शना दोन्ही जण जाताना दिसत आहे. मात्र राहुल एकटाच परत आला. त्याच्यासोबत गेलेली दर्शना परत आली नाही. त्यामुळे पोलिसांना संशय बळावला. पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुल हंडोरे याचा शोध सुरू केला.
का केला खून
दर्शनाने राहुल याच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. तो राग त्याच्या डोक्यात होता. मग राहुल याने गोड बोलून दर्शना हिला ट्रेकला नेले. त्या ठिकाणी लग्न न करण्याच्या कारणावरून दर्शनासोबत वाद घातला आणि दगडाने तिचा खून केला.
राहुलची भटकंती
पोलिसांनी त्याच्या नातेवाईकाचा फोन घेतला अन् त्यावरुन राहुल याला मेसेज पाठवला. तुला काही पैशाची गरज आहे का? अशी विचारणा मेसजच्या माध्यमातून केली. त्या मेसेजला अपेक्षेप्रमाणे राहुलकडून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पोलीस त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवू लागले. त्याचे लोकेशन ट्रेस होऊ लागले होतो. तो कुठे जात आहे, याची माहिती पोलिसांना मिळू लागली. त्याला पैशाची गरज असल्याचे पोलिसांनी पैसही पाठवले. अखेर राहुल हंडोरे याला मुंबईवरुन पुण्याकडे जात असताना पोलिसांनी अटक केली.
अनेक वर्षाची ओळख आणि राहुल हंडोरे याच्यावर ठेवलेल्या विश्वासानेमुळे दर्शनाचा घात झाला. तर दुसरीकडे क्षणिक प्रेमभंगाच्या रागातून राहूल ने स्वःतच आयुष्य उध्वस्त करून घेतले.