आईच्या स्मरणार्थ मुलांनी असे काही केले की लोकांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव
निधनानंतर वर्षश्राद्ध सारेच घालतात. पण, आपण काहीतरी वेगळ करावं, असं मुलांना वाटलं. त्यांनी आईच्या स्मरणार्थ हे कौतुकास्पद काम केलं.
पुणे : ही घटना आहे भोर तालुक्यातील नांद गावातील. शिक्षक सुनील दत्तात्रय गोळे आणि संतोष दत्तात्रय गोळे (मेकॅनिक) या दोन भावांची. यांच्या शेती करणाऱ्या मातोश्री राहीबाई गोळे (वय ६२) यांचे वर्षापूर्वी कोरोनामुळे बाणेर (पुणे) येथे निधन झाले. निधनानंतर वर्षश्राद्ध सारेच घालतात. परंतु, आईविषयी असणारे प्रेम, श्रद्धा, भावना व्यक्त करताना गोळे कुटुंबाने घरासमोरच मंदिर उभारले. त्या मंदिरात आईच्या मूर्तीची स्थापना केली आहे. या कुटुंबाने आईचे स्मारक उभारुन एक नवा आदर्श समाजासमोर निर्माण केला आहे.
राहीबाई यांनी शेती आणि सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या पती दत्तात्रय गोळे यांच्यासोबत ४५ वर्षे सुखात संसार केला. दोन मुले आणि दोन मुलींना चांगले शिक्षण देऊन संस्कार दिले. राहीबाई या कुटुंबावरच प्रेम करुन थांबल्या नाहीत तर आपले नातेवाईकांचेही भले केले. गावासाठी असणारे प्रेम आपुलकी आजही ग्रामस्थ आणि सगेसोयरे बोलून दाखवत आहेत.
यांनी ठरवलं काय करायचं
आईच्या निधनानंतर घरी आई नसल्याचं दुःख सहन होत नव्हते. मनात आईची आठवण सतत येत होती. त्यावेळी राहीबाई यांचे पती दत्तात्रय गोळे तसेच सुनील, संतोष ही दोन मुले, निलीमा खंडाळे, प्रमिला पाडळे या दोन मुली आणि संतोष पाडळे (जावई) यांनी विचार विनीमय केला. राहीबाई यांचे स्मारक बांधण्याचे ठरवले. ८ एप्रिल रोजी पुतळा अनावरण सोहळ्याने सत्यात उतरले आहे.
यावेळी होमहवन, महाप्रसाद, हभप नेहाताई साळेकर यांचे कीर्तन, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विठ्ठल आवाळे यांचे हस्ते स्मारकाचे उद्घाटन झाले. यावेळी बीडी गायकवाड, सरपंच प्रिती गोळे, नातेवाईक, नांद गावातले आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
आईचा हुबेहुब मेणाचा पुतळा
पुण्याच्या भोर तालुक्यातल्या नांद गावातील दोघा भावांनी आईच्या स्मरणार्थ घरासमोर आईच स्मारक उभारलंय. दिवंगत आईचा हुबेहूब फायबरचा पुतळा बनवून घरासमोच्या अंगणात त्याची स्थापना केलीय. शिक्षक असलेल्या सुनील गोळे आणि मेकॅनिक असलेल्या संतोष गोळे या दोघा भावांनी समाजासमोर आदर्श ठेवलाय. परिसरातल्या नागरिकांनी गोळे कुटुंबाच्या या कृतीचं कौतुक केलंय.