JEE-Mains परीक्षा गैरव्यवहार, पुणे येथे CBI ची छापेमारी
चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आरोपींनी दहावी आणि बारावीच्या मार्कशीट, युजर आयडी, पासवर्ड आणि विद्यार्थ्यांचे पोस्ट डेट चेक जामीन म्हणून घेतले होते.
पुणे : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने 2021 च्या संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE-Mains) गैरव्यवहारांच्या संदर्भात पुण्यासह देशातील 19 ठिकाणी छापे टाकले. दिल्ली, जमशेदपूर, इंदूर आणि बंगळुरू येथे शनिवारी टाकलेल्या छाप्यांमध्ये २५ लॅपटॉप, सात डेस्कटॉप, सुमारे ३० पुढील तारखांचे चेक, विविध विद्यार्थ्यांच्या तात्पुरत्या पदवी प्रमाणपत्र इतर अनेक कागदपत्रे असा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात अधिक जणांची चौकशी करण्यात येणार असल्याचे सीबीआयकडून सांगण्यात आले.
CBIने एक आरोपी विजय दहिया याला गुरुग्राम येथून अटक केली. त्याला जिल्हा न्यायालयाने पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. या प्रकरणात अनेक लोकांची चौकशी केली जात असून तपास सुरू असल्याचे सीबीआयच्या प्रवक्त्याने सांगितले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, एफिनिटी एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडचे तीन संचालक सिद्धार्थ कृष्णा, विश्वंभर मणी त्रिपाठी आणि गोविंद वार्ष्णेय, तसेच अनेक दलालांवर गुन्हा दाखल केला होता.
काय आहे प्रकरण
या तिन्ही संचालकांनी त्यांचे सहकारी आणि दलालांसोबत मिळून ऑनलाइन जेईई (मेन) मध्ये हेराफेरी करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. या विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका हरियाणातील सोनीपत येथील एका दुर्गम परीक्षा केंद्रातून सोडवल्या जात होत्या. त्यांना विद्यार्थ्यांकडून पैशांच्या बदल्यात देशातील आघाडीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून दिला जात होता.
आरोपींनी दहावी आणि बारावीच्या मार्कशीट, युजर आयडी, पासवर्ड आणि विद्यार्थ्यांचे पोस्ट डेट चेक जामीन म्हणून घेतले होते. एकदा प्रवेश झाल्यानंतर प्रति विद्यार्थ्याकडून 12 ते 15 लाख रुपये इतकी मोठी रक्कम आकारण्यात येत होती.
परीक्षा थांबवली होती
जेईई मेन प्रथम सत्र 1 च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. सत्र 2 ची परीक्षा एप्रिलमध्ये होणार होती. दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेला बसतात. जेईई परीक्षेचा पेपर फुटल्याची बातमी आली होती. मात्र, परीक्षा होण्यापूर्वीच रद्द करण्यात आली. यामुळे दलालांचे भांडफोड झाले.