गुलाल कुणाच्या भाळी?, मतदानाला सुरुवात, कसबा आणि चिंचवडमध्ये किती लाख मतदार ठरवणार उमेदवारांचं भवितव्य?
कसब्यात महविकास आघाडीचे रवींद्र धगेकर विरुद्ध भाजपचे हेमंत रासने यांच्यात मुख्य लढत आहे. कसब्यात एकूण 1 लाख 38 हजार 550 महिला मतदार आहेत. तर 1 लाख 36 हजार 873 पुरुष मतदार आहेत.
कसबापेठ : कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदारांनी सकाळी सकाळीच मतदार केंद्रावर हजेरी लावून मतदानात भाग घेण्यास सुरुवात केली आहे. या मतदानासाठी दोन्ही मतदारसंघात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकडे पोलिसांचं लक्ष लागलं आहे. आज मतदान झाल्यावर येत्या 2 मार्च रोजी निवडणूक निकाल लागणार आहे. चिंचवडमध्ये तिरंगी लढत होणार आहे. चिंचवडमध्ये भाजपकडून अश्विनी जगताप, राष्ट्रवादीकडून नाना काटे आणि अपक्ष उमेदवार म्हणून राहुल कलाटे निवडणूक लढवत आहेत. तर कसब्यातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, भाजपचे हेमंत रासने आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यात लढत होत आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू झालं आहे. या निवडणुकीत घोडेबाजार सुरू असल्याने त्याअनुषंगाने 14 पथकं तैनात करण्यात आली आहेत. आज एकूण 510 केंद्रावर मतदान होणार आहे. यात 13 संवेदनशील मतदान केंद्र आहेत. 5 लाख 68 हजार मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
कसब्यात मोठा बंदोबस्त
कसब्यात महविकास आघाडीचे रवींद्र धगेकर विरुद्ध भाजपचे हेमंत रासने यांच्यात मुख्य लढत आहे. कसब्यात एकूण 1 लाख 38 हजार 550 महिला मतदार आहेत. तर 1 लाख 36 हजार 873 पुरुष मतदार आहेत. तर तृतीयपंथी मतदार 5 आहेत. कसब्यात एकूण मतदार केंद्र 76 आहेत. तर बूथ संख्या 270 आहे. 9 मतदार केंद्र संवेदनशील आहेत. मतदानासाठी 1300 पोलीस कर्मचारी तैनात. एकूण 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
दिग्गजांनी मैदान गाजवलं
कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत दिग्गजांनी जोरदार प्रचार केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,
खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजप नेते आशिष शेलार यांनी निवडणूक प्रचारात भाग घेतला होता. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मतदारांशी ऑनलाइन संवाद साधला होता. त्यामुळे गेली आठ दिवस या दोन्ही निवडणुकीतील राजकारण चांगलंच तापलं होतं.