Manoj Avhad murder case : मनोज आव्हाडचा निर्दयी खून करणाऱ्यांवर 302नुसार गुन्हा दाखल करा, लहुजी शक्ती सेनेचा शिरूरमध्ये रास्तारोको
विविध मागण्या करत शिरूर शहर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने सतरा कमानी पुलावर जन आक्रोश रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन दिले.
पुणे : औरंगाबाद येथील मनोज आव्हाड या तरुणास अमानुष मारहाण करत त्याची हत्या (Murder) करण्यात आली. या हत्याकांडाच्या निषेधार्थ पुणे जिल्ह्याच्या शिरूर येथे पुणे-नगर महामार्गावर सतरा कमानी पूल येथे लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जन आक्रोश रस्ता रोको आंदोलन (Agitation) करण्यात आले. यावेळी घोषणाबाजी करत युवक तसेच महिला आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या. महामार्गावर दोन्ही बाजूने सुमारे एक तास वाहतूक ठप्प झाली होती. पुणे-नगर महामार्गावर (Pune Nagar road) रस्ता रोको आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी आंदोलक आक्रमक झाले होते. या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. मागील महिन्यात सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या मनोज आव्हाड या तरुणाची चोरीच्या संशयावरून बेदम मारहाण करत हत्या करण्यात आली होती.
‘मुख्य सूत्रधारावर 302नुसार गुन्हा दाखल करून सहआरोपी करावे’
मनोज आव्हाड हत्याकांडाच्या मुख्य सूत्रधारावर 302नुसार गुन्हा दाखल करून सहआरोपी करण्यात यावे. तसेच मनोज आव्हाडचा निर्दयी खून करणाऱ्या 11 आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्ट (जलदगती न्यायालय) खून प्रकरण चालवून फाशीची शिक्षा देण्यात यावी, मनोज आव्हाड यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करून या पूर्ण नियोजित खटल्याचे निकाल लागेपर्यंत त्यांच्या परिवारास पोलीस संरक्षण देण्यात यावे व शासनामार्फत मृत मनोज आव्हाड यांच्या कुटुंबीयांना कमीत कमी एक कोटी रुपये अर्थ साह्य देण्यात यावे, अशा विविध मागण्या करत शिरूर शहर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने सतरा कमानी पुलावर जन आक्रोश रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन दिले.
लहुजी शक्ती सेनेचा आक्रमक पवित्रा
लहुजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनास महाराष्ट्र कोअर कमिटी प्रदेश अध्यक्ष कैलास खंदारे, लहुजी शक्ती सेना विद्यार्थी महाराष्ट्र अध्यक्ष हेमंत खंदारे, लहुजी शक्ती सेना पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ता जगताप, पुणे जिल्हा कोअर कमिटी पुणे जिल्हा अध्यक्ष दादाभाऊ लोखंडे, लहुजी शक्ती सेना शहराध्यक्ष विशाल उर्फ बंटी जोगदंड, शिरूर शहर उपाध्यक्ष सचिन काळोखे, आकाश पवार, पप्पू शेंडगे, महिला अध्यक्षा वनिता शेलार, फुलाताई थोरात, तालुकाध्यक्ष मोनिका जाधव, शहराध्यक्ष संध्या जाधव, उपशहर अध्यक्ष बबई नाडे आदी सहभागी झाले होते.