पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये ११ वी प्रवेश प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद, ५३ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रक्रियेबाबत एकही तक्रार नाही!
नोंदणी सुरू झाल्यापासून चारच दिवसांत पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) तब्बल ५३ हजार ८०५ नोंदणी करून अर्जाचा पहिला भाग भरला आहे. तर ७ हजार १६२ विद्यार्थ्यांनी अर्जाचा दुसरा भाग भरला आहे. विशेष म्हणजे, तांत्रिक कारणासाठी किंवा अर्ज भरण्यासंदर्भात कॉल सेंटरला अजून तरी कोणतीही तक्रार आलेली नाही.
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात ११ वी प्रवेश प्रक्रियेला (11th Admission Process) वेग आला आहे. विद्यार्थ्यांचा नोंदणी प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. नोंदणी सुरू झाल्यापासून चारच दिवसांत पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) तब्बल ५३ हजार ८०५ नोंदणी करून अर्जाचा पहिला भाग भरला आहे. तर ७ हजार १६२ विद्यार्थ्यांनी अर्जाचा दुसरा भाग भरला आहे. विशेष म्हणजे, तांत्रिक कारणासाठी किंवा अर्ज भरण्यासंदर्भात कॉल सेंटरला अजून तरी कोणतीही तक्रार आलेली नाही. (Large number of students are filling up online admission process for 11th standard in Pune and Pimpri Chinchwad)
पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागासाठी अकरावी प्रवेश नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अकरावी प्रवेश नोंदणी दोन भागांमध्ये विभागण्यात आली आहे. पहिल्या भागात विद्यार्थ्यांची सर्व माहिती भरायची आहे तर दुसऱ्या भागात महाविद्यालयांचे पर्याय देण्यात आले आहेत. यानुसार विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
२२ ऑगस्टपर्यंत भरायचा दोन्ही भागांचा अर्ज
विद्यार्थ्यांना आपल्या नोंदणी अर्जातला पहिला आणि दुसरा भाग १४ ते २२ ऑगस्टदरम्यान भरायचा आहे. दुसरा भाग भरण्यासाठी १७ ऑगस्टपासून मुभा देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जाच्या पहिव्या भागाची पडताळणी केल्यानंतरच दुसरा भाग भरण्यासाठी परवानगी दिली जाते. महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी केली जात आहे आणि त्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं जात आहे. तसे निर्देश महाविद्यालयांना देण्यात आले आहेत.
२५ ऑगस्टला जाहीर होणार अंतिम गुणवत्ता यादी
येत्या २-३ दिवसांत विद्यार्थ्यांच्या नोंदणी प्रक्रियेला आणखी वेग येईल असं सांगण्यात येत आहे. २२ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणीचे दोन्ही भाग पूर्ण करायचे आहेत. त्यानंतर २३ आणि २४ ऑगस्टला प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. तर २५ ऑगस्टला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. यंदा पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये २९८ महाविद्यालयांमध्ये १ लाख ६ हजार ६४५ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी आता पर्यंत ५३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत.
अर्ज भरण्यासंदर्भात एकही तक्रार नाही!
ऑनलाईन पद्धतीने ११ वीची प्रवेश नोंदणी प्रक्रिया पार पडत आहे. ऑनलाईन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी अडचणी येतील असं बोललं जात होतं. विद्यार्थी आणि पालकांच्या समस्या सोडवण्यासाठी कॉल सेंटर आणि हेल्प सेंटर्सचीही उभारणी करण्यात आली आहे. मात्र, विद्यार्थी अगदी चौकसपणे आपले अर्ज भरत आहेत. महाविद्यालयांचे पर्यायही अगदी व्यवस्थितपणे भरले जात आहेत. त्यामुळे तांत्रिक कारणं किंवा अर्ज भरण्यासंदर्भात कॉल सेंटरकडे अद्याप एकही तक्रार आलेली नाही.
संबंधित बातम्या :