जरांगे फक्त बाहुला, हा तर शरद पवारांचा स्क्रिप्टेड प्रोग्रॅम; कुणी केले गंभीर आरोप?
Laxman Hake on Sharad Pawar and Manoj Jarange Patil : शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. यात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाचा दाखला देण्यात आला आहे. वाचा सविस्तर...
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी जो लढा देत आहेत. त्यामागे शरद पवार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी शरद पवार यांच्यावर हे गंभीर आरोप केले आहेत. मराठा आरक्षण आंदोलनामागे शरद पवारांचा हात असल्याचा आरोप हाके यांनी केला आहे. मनोज जरांगे हा फक्त बाहुला आहे. शरद पवार यांचा हा स्क्रिप्टेड प्रोग्रॅम आहे, असं लक्ष्मण हाके म्हणाले.
भुजबळ- पवार भेटीवर काय म्हणाले?
परवा दिवशी दुपारी छगन भुजबळ यांनी ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जात शरद पवार यांची भेट घेतली. आरक्षणावरून निर्माण झालेली परिस्थिती पवारांनी नियंत्रणात आणावी, असं भुजबळ म्हणाले. यावर लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांना सुद्धा आमची आता कळकळीची विनंती आहे की, तुम्ही हे आता असले उद्योग बंद करा. आपण जनतेमध्ये जाऊ…. भुजबळसाहेब आता तुम्ही जनतेचा आवाज बना… हा असला प्रोफेशनलपणा बंद करा. जरांगे हा फक्त बाहुला आहे. शरद पवार यांचा हा स्क्रिप्टेड प्रोग्रॅम आहे. शरद पवार यांनी नाव नाही घेतलं तरी महाराष्ट्रातील अठरापगड जातीतील बलुतेदारांनी ओबीसींमध्ये कुणाचं नाव घ्यायचं? आणि कुणाचं नाही घ्यायचं हे आता निश्चित ठरवेल, असा सवाल हाकेंनी केला आहे.
छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीला जाण्यापूर्वीच आम्ही खूपदा विचारलं होतं की जाणते राजे कुठे आहेत? पुरोगामी नेते कुठे आहेत फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेणारे शरद पवार कुठे आहेत? पण आज शरद पवारांनी त्यांची मनोवृत्ती दाखवून दिली, असा घणाघात लक्ष्मण हाकेंनी केला आहे.
“पवार आमचं नाव का घेतील?”
एका मेंढपाळाच्या पोराचं नाव शरद पवार कशाला घेतील? पवारसाहेब हे दरबारी राजकारण करतात वतनदार सरदार यांच्या टोळीचे प्रमुख शरद पवार आहेत. उठता बसता शरद पवार यांच्या तोंडात फुले शाहू आंबेडकर पुरोगामी महाराष्ट्र हे नाव असतं म्हणून आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करतो. पवारसाहेबांनी नाव नाही घेतलं तरी सत्य आणि संविधानिक चौकट, सामाजिक न्यायाचे धोरण याबाबतीत आम्ही आवाज उठवणार आहोत. शरद पवारांकडून आता आम्ही अपेक्षा सोडलेल्याच आहेत, असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय.