Rain : राज्यभरात पाऊस पुन्हा परतणार, आता कधी, कुठे दिला पावसाचा अलर्ट
IMD Weather forecast : राज्यात पावसाने दडी मारली होती. ऑगस्ट महिना सुरु झाल्यापासून राज्यात पाऊस नव्हता. परंतु आता राज्यात पाऊस परतला आहे. विदर्भात पाऊस सुरु झाला असून अनेक भागांत यलो अलर्ट दिला आहे.
पुणे | 19 ऑगस्ट 2023 : ऑगस्ट महिन्यात सुटीवर गेलेला पाऊस राज्यात परतणार आहे. राज्यात श्रावण सरी आता सुरु होणार आहे. विदर्भातील अनेक भागांत पाऊस सुरु झाला आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी शुक्रवारी पाऊस झाला. आता २५ ऑगस्टपर्यंत राज्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे चिंतेत असणारा शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यंदा १९७२ नंतर पावसाचा सर्वात मोठा खंड पडला आहे.
काय आहे अंदाज
शनिवारपासून कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. तर मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि जळगावला पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
पुणे जिल्ह्यात पाऊस
पुण्यात देखील हवामान खात्याकडून यलो अलर्ट दिला आहे. पुढील 3 दिवस पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
या भागांत बरसणार
विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूरसह जवळपास सर्व जिल्ह्यात मुसळधार जलधारा बरसणार आहे. मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली कोल्हापूरत मध्यम पावसाची शक्यता आहे. आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर भुसावळमधील मुक्ताईनगर तालुक्यांमध्ये सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. नंदुरबार तालुक्याच्या पूर्वपट्ट्यात पाऊस नसल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. यामुळे शेतकऱ्यांसमोर चिंता निर्माण झाली आहे. परंतु आता हवामान विभागाकडून दिलासा मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारीही सकाळपासूनच जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाला. गेल्या अनेक दिवसांच्या खंडानंतर नांदेडमध्ये पावसाने हजेरी लावलीय. हवामान खात्याने नांदेडला यलो अलर्टचा अंदाज दिलाय. धुळे जिल्ह्यामध्ये यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अंतर्गत मशागती वर भर दिलेला आहे. वारंवार कोळपणी आणि निंदणी करून तण वाढू न देण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत.