Tukaram Supe : राज्य परीक्षा परिषद आयुक्त तुकाराम सुपेला जामीन; टीईटी परीक्षा घोटाळाप्रकरणी डिसेंबरमध्ये झाली होती अटक
म्हाडाच्या परीक्षेसंदर्भात प्रीतीश देशमुख याच्या घरी केलेल्या छापेमारीत 2020च्या टीईटी परीक्षेचे सुमारे 40 ते 50 विद्यार्थ्यांचे ओळखपत्र सापडले होते. यामुळे टीईटी परीक्षेसंदर्भात चौकशी सुरू करण्यात आली होती.
पुणे : टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरण राज्य परीक्षा परिषद आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) याला जामीन मंजूर झाला आहे. शिवाजीनगर कोर्टाने हा जामीन मंजूर केला आहे. तुकाराम सुपेला सायबर पोलिसांनी 17 डिसेंबरला अटक केली होती. 5 महिन्यानंतर तुकाराम सुपेला आता जामीन मंजूर झाला आहे. दरम्यान, तुकाराम सुपेकडून पोलिसांनी कारवाईदरम्यान 2 कोटी 34 लाख रुपये आणि 65 लाखांचे दागिने जप्त केले होते. म्हाडा पेपर फुटी प्रकरणात (Mhada Paper Scam) अटक आरोपी डॉ. प्रीतिश देशमुख (Pritish Deshmukh) याच्या घरी टीईटी परीक्षेची ओळखपत्र सापडल्यानंतर पुणे पोलिसांनी टीईटी परीक्षेचा घोटाळा शोधण्यासाठी तपास सुरू केला. पुणे सायबरच्या कार्यालयांमध्ये ही चौकशी करून नंतर सुपेला अटक करण्यात आली होती. महाटीईटी परीक्षेची जाहिरात 2019मध्ये देण्यात आली होती. त्यानंतर याची परीक्षा जानेवारी 2020मध्ये झाली होती. त्या शिक्षक पात्रता परीक्षेत पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचा ठपका तुकाराम सुपेवर आहे.
कुंपणानेच खाल्ले शेत
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून महाटीईटी आणि शिष्यवृत्ती परीक्षांचे आयोजन केले जाते. बी. एड्. आणि डी. एड्. झालेल्या विद्यार्थ्यांची शिक्षक पात्रता परीक्षा घेतली जाते. विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षकांच्या पात्रता परीक्षेची जबाबदारी असलेल्या तुकाराम सुपेलाच अटक झाली. त्यामुळे टीईटी परीक्षेसंदर्भात कुंपणानेच शेत खाल्ले अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे.
विद्यार्थ्यांकडून घेतले पैसे
म्हाडाच्या परीक्षेसंदर्भात प्रीतीश देशमुख याच्या घरी केलेल्या छापेमारीत 2020च्या टीईटी परीक्षेचे सुमारे 40 ते 50 विद्यार्थ्यांचे ओळखपत्र सापडले होते. यामुळे टीईटी परीक्षेसंदर्भात चौकशी सुरू करण्यात आली होती. तुकाराम सुपे याने 1 कोटी 70 लाख, प्रीतिश देशमुख याने 1 कोटी 25 कोटी तर अभिषेक सावरीकर याने 1 कोटी 25 लाख असे एकूण 4 कोटी 20 लाख रुपये घेतल्याचे चौकशीत कबुल केले होते. त्यापैकी काही रक्कम जप्त करण्यात आली होती. प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 50 हजार ते 1 लाख रुपये घेतल्याचे समोर आले होते.
तुकाराम सुपेविषयी…
तुकाराम सुपे हा महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचा अध्यक्ष होता. तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे होता. सुपेवर युवाशाही आणि एमपीएससी समन्वय समिती आधीपासूनच नाराज होती. उत्तर सूची आणि प्रश्न सूचीत तफावत असल्याची तक्रार या दोन्ही संघटनेकडून करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणाची चौकशी झाली नव्हती. तसेच शिक्षण परिषदेने या तक्रारीवर आपले उत्तरही दिले नव्हते. त्यामुळे या विद्यार्थी संघटनांचा संशय अधिकच बळावला होता. त्यानंतर हा घोटाळा उघड झाल्याने सुपेचे काळे कारनामेही उघड झाले.