शौचास गेलेल्या महिलेवर हल्ला करुन डोळा काढणाऱ्या नराधमाला अटक, पुणे पोलिसांची मोठी कामगिरी
आज शिक्रापूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला अटक करून ताब्यात घेतलं आहे.
पुणे : शिरुर तालुक्यातील न्हावरा इथं महिलेचा विनयभंग करून मारहाण करून दोन्ही डोळे निकामी केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीसांचे (Pune Police) संयुक्त कामगिरीत आरोपीला जेरबंद करण्यात आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. पण पुणे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यामुळे नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे. (Man arrested for attacking woman and injured her eye in pune)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक अनेाळखी उंचीने लहान, तोंडाला लाल रंगाचा कपडा बांधलेल्या व्यक्तीने पीडित महिलेची छेड काढत तिला मारहाण केली. यानंतर तिच्या डोळयांना गंभीर दुखापत करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी शिरूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर आज शिक्रापूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला अटक करून ताब्यात घेतलं आहे. पुणे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, ही घटना 3 नोव्हेंबर रोजी घडली होती. पीडित महिलेला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. न्हावरे गावातील बिडगर-सुर्यवंशी वस्ती इथं वास्तवास असलेल्या मुक्ता राजू चित्रे या मंगळवारी (3 नोव्हेंबर) रात्री 9 वाजेच्या सुमारास शौचास गेल्या होत्या. त्यावेळी तिथे एक नराधम त्यांच्याकडे पाहू लागला. त्यामुळे तुला बाईमाणूस दिसत नाही का? असं मुक्ता चित्रे त्या नराधमाला म्हणाल्या. त्यानंतर त्या नराधमाने मुक्ता यांच्यावर हल्ला करत त्यांचा एक डोळा काढला. तर दुसऱ्या डोळ्यालादेखील गंभीर जखमी केलं. (Man arrested for attacking woman and injured her eye in pune )
मुक्ता चित्रे यांचे कुटुंबीय त्यांचा शोध घेत घटनास्थळी पोहोचले तेव्हा मुक्ता तिथे गंभीर जखमी होऊन निपचित पडल्या होत्या. त्यावेळी त्यांचा एक डोळा जमिनीवर पडला होता. तर दुसऱ्या डोळ्याही गंभीर जखमी होता. या घटनेची तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची माहिती घेतली.
यानंतर महिलेला उपचारासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महिलेचा दुसरा डोळादेखील गंभीर जखमी आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, महिलेचा दुसरा डोळादेखील वाचण्याची शक्यता कमी आहे. घडलेल्या घटनेची गंभीर दखल घेत पुणे (ग्रामीण) पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, शिरुरचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी कसून तपास सुरु केला आणि आरोपीला अटक केली.
इतर बातम्या –
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू
भिगवणमध्ये 150 किलो गांजा जप्त, पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई
(Man arrested for attacking woman and injured her eye in pune )