गुढीपाडव्याच्या आनंदासाठी सरकारकडून आनंदाचा शिधा, पण शिधाविना होणार गुढीपाडवा
राज्य शासनाने गुढीपाडव्यासाठी 'आनंदाचा शिधा' देण्याची घोषणा केली. परंतु हा आनंदाचा शिधा अद्याप गोदामातच आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे हा शिधा स्वस्त धान्य दुकानापर्यंत पोहचला नाही. त्यामुळे धान्य दुकानदार त्याचे वाटप करु शकले नाही.
योगेश बोरसे, पुणे : दिवाळीनंतर आता गुढीपाडवाही गोड व्हावा, म्हणून शासनाने शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला. गुढीपाडव्याच्यापूर्वी शिधा मिळेल, अशी रेशन कार्डधारकांना अपेक्षा होती. परंतु आता गुढीपाडवा एक दिवसांवर आला असूनही पुणे जिल्ह्यात व राज्यात अनेक ठिकाणी पूर्ण किट प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे रेशन कार्डधारकांना ‘आनंदाचा शिधा विनाच गुढीपाडवा साजरा करावा लागणार आहे. शहरी व ग्रामीण भागात आनंदाच्या शिधा न पोहोचल्याने नागरिकांमध्ये नाराजी सूर उमटत आहे. दिवाळीतील आनंदाचा शिधा दिवाळीनंतर मिळाला होता. आताही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
गुढीपाडव्याचा ‘आनंदाचा शिधा’ अद्याप गोदामातच आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे हा शिधा स्वस्त धान्य दुकानापर्यंत पोहचला नाही. त्यामुळे धान्य दुकानदार त्याचे वाटप करु शकले नाही.राज्य सरकारने गुढीपाडवा व सणांच्या पार्श्वभूमीवर स्वस्त धान्य दुकानात शंभर रुपयात आनंदाचा शिधा पोहोचवण्यासाठी जय्यत तयारी केली होती. मात्र गेले आठ दिवस राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप व वाहतूक व्यवस्थेतील अडचणी यामुळे आनंदाचा शिधा पोहोचण्यात विघ्न आले. या महिन्याच्या शेवटपर्यंत आनंदाचा शिधा विविध रेशन दुकानात पोहोचण्याची शक्यता आहे. आनंदाचा शिधाविनाच यंदाचा गुढीपाडवा होणार आहे.
पुणे जिल्ह्यात शिधा नाही
पुणे जिल्ह्यात अद्याप आनंदाचा शिधा पोहचला नाही. जिल्ह्यात आनंदाचा शिधा अद्याप गोडाऊनमध्येच पडून आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शिधा राशन दुकानापर्यंत पोहचू शकला नाही. उद्याच्या गुढी पाडव्यासाठी आज संध्याकाळपर्यंत शिधा राशन दुकानांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. मग दुकानदार त्याचे वाटप कधी करणार आणि सामान्य त्या शिधाचा वापर करुन कधी गुढीपाडवा साजरा करणार, हे प्रश्न आहेत.
नागपुरात आठ दिवस लागणार
नागपुरात आनंदाचा शिधा पोहोचायला आणखी आठ दिवस लागणार आहे. नागपुरात या महिन्याचं धान्य वितरीत झालंय. त्यामुळे काही दुकानातून पुढच्या महिन्यात हा आनंदाचा शिधा वितरीत केला जाणार आहे. सरकारकडून आधीच शिधा वितरण सुरु करायला हवं होतं, असं मत प्रदेश काँग्रेस रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गुड्डू अग्रवाल यांनी व्यक्त केलंय.
आनंदाचा शिधा लवकरात लवकर स्वस्त धान्य दुकानांवर पोहोचावा यासाठी सरकारने आदेश काढले आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र नाशिकच्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये आनंदाचा शिधा पोहोचलेला नाही. त्यामुळे गुढीपाडवा अर्थात मराठी नवीन वर्ष आनंदाच्या शिधा शिवाय गोरगरिबांना साजरा करावा लागणार आहे.