Pune crime : अमली पदार्थांचा विळखा! पुण्यातल्या सिंहगड रोड आणि येरवड्यात गांजासह मेफेड्रॉन जप्त, गुन्हा दाखल
घरातच गांजाचे दुकान थाटणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. घरातील पोत्यात हा गांजा साठवण्यात आला होता. तो छोट्या पाकिटात टाकून ते विकत असल्याचे स्पष्ट झाले होते. अमली पदार्थविरोधी पथकाने आंबेगाव बुद्रुक परिसरात त्याच्या घरावर छापा टाकून मुद्देमाल जप्त केला आहे.
पुणे : पुण्यातील सिंहगड रोड आणि येरवडा परिसरातून अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहेत. पहिल्या घटनेत येरवडा परिसरातून अमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti narcotic cell) एका सराईत गुन्हेगाराकडून तब्बल सात लाख 88 हजार रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले. समीर उर्फ आयबा शहाजहान शेख असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थविरोधी पथकाचे कर्मचारी येरवडा (Yerwada) परिसरात गस्त घालत असताना त्यांना पर्णकुटी परिसरात आरोपी संशयास्पदरित्या फिरताना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली. यावेळी 52 ग्रॅम 090 मिलीग्रॅम मेफेड्रॉन (Mephedron) हा अंमली पदार्थ सापडला. याशिवाय त्याच्याजवळ इलेक्ट्रॉनिक वजन काटा, मोबाइल फोन असा एकूण 7 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. येरवडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरातच थाटले गांजाचे दुकान
अशीच प्रकारची कारवाई सिंहगड रोड येथेही करण्यात आली आहे. घरातच गांजाचे दुकान थाटणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. घरातील पोत्यात हा गांजा साठवण्यात आला होता. तो छोट्या पाकिटात टाकून ते विकत असल्याचे स्पष्ट झाले होते. अमली पदार्थविरोधी पथकाने आंबेगाव बुद्रुक परिसरात त्याच्या घरावर छापा टाकून मुद्देमाल जप्त केला आहे. अमित उर्फ बॉबी प्रभाकर कुमावत (वय 32) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
सव्वा चार लाखांचा गांजा जप्त
जवळपास 2 पोत्यांमधला 20 किलो 940 ग्रॅम गांजा पोलिसांनी यावेळी जप्त केला. याची किंमत एकूण चार लाख 23 हजार रुपये आहे. सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. घरातच गांजाची विक्री होत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर त्याच्या घरावर छापा टाकला असता आतल्या रूममध्ये दोन वेगवेगळ्या पोत्यांमध्ये गांजा साठवलेला पोलिसांना दिसून आला. हा माल आता पोलिसांनी जप्त केला आहे.