Pune Metro : पुण्याच्या खडकीतही लवकरच उभे राहणार मेट्रोचे खांब; मिळणार जागेचा ताबा
पुणे मेट्रोच्या (Pune Metro) उर्वरित मार्गांची पुणेकर उत्सुकतेने वाट पाहत आहेत. त्यात आता एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. हॅरिस पुलालगतचा (Harris Bridge) मेट्रो मार्ग जवळपास तयार झाला आहे.
पुणे : पुणे मेट्रोच्या (Pune Metro) उर्वरित मार्गांची पुणेकर उत्सुकतेने वाट पाहत आहेत. त्यात आता एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. हॅरिस पुलालगतचा (Harris Bridge) मेट्रो मार्ग जवळपास तयार झाला आहे. खडकीतील (Khadki) उर्वरित मार्गावरील खांब उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या जागेचा ताबा येत्या काही दिवसात मिळणार आहे. त्यामुळे काम सुरू करण्यात येणार असल्याचे महामेट्रोने म्हटले आहे. महामेट्रोच्या अधिकार्यांनी सांगितले, की जमिनीसंबंधीच्या काही औपचारिक बाबी बाकी असल्याने काम संथगतीने सुरू आहे. जमीन ताब्यात घेण्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडील सर्व औपचारिकता मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत. जमीन हस्तांतरित केल्याने मेट्रोचे आठ खांब उभारण्याचा मार्ग मोकळा होईल. खडकी भागातील उर्वरित मार्गावरील मेट्रोच्या कामालाही गती देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गर्डरचे काम पूर्ण
आम्ही नुकतेच रेंज हिल्सच्या दिशेने व्हायाडक्ट भाग वाढवण्यासाठी रेल्वे ट्रॅक ओलांडण्यासाठी गर्डरचे काम पूर्ण केले. बोपोडी आणि खडकी या दोन मेट्रो स्थानकांचे कामही हाती घेण्यात आले आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील बहुतांश खांब येत्या काही दिवसांत तयार होणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हॅरिस ब्रिज येथील महत्त्वाच्या पुलाचे काम शेवटच्या टप्प्यात
महामेट्रोने गेल्या महिन्यात PCMC ते फुगेवाडी हा भाग व्यावसायिक तत्त्वावर कार्यान्वित केला. फुगेवाडी-बोपोडी-खडकी-रेंज हिल्स-अॅग्रिकल्चर कॉलेज हा भाग प्राधान्याने कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आता निश्चित करण्यात आले आहे. महामेट्रोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की आम्हाला हे काम लवकरात लवकर पूर्ण करायचे आहे. हॅरिस ब्रिज येथील महत्त्वाच्या पुलाचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. दोन रस्त्यांच्या पुलांदरम्यान मेट्रो मार्ग तयार करण्यात आला आहे. दोन्ही पुलांवरील खांबांमुळे वाहनांच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही.
भूमिगत मार्ग
मेट्रो मार्ग रेंज हिल्सपर्यंत पोहोचल्यानंतर कृषी महाविद्यालयाच्या दिशेने भूमिगत होईल. व्हायाडक्टची उंची हळूहळू कमी होत जाईल आणि कृषी महाविद्यालयात मेट्रो मार्ग बोगद्यामध्ये भूमिगत होईल. दिवाणी न्यायालयापर्यंत बोगद्याचे काम पूर्ण झाल्याचे महामेट्रोने म्हटले आहे. ट्रॅक टाकण्याचे आणि ओव्हरहेड ट्रॅक्शनचे कामही लवकरच सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली.