Pune MNS : गनिमी कावा फसला; पुण्याच्या कस्तुरे चौकातल्या बंदिवान मारुती मंदिरातून मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
मनसे कार्यकर्ते पोलिसांची नजर चुकवून आले आणि मंदिरात पोहोचताच महाआरती करायला लागले. त्यावेळी तेथे पोलीस (Police) दाखल झाले. मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेण्यात आले.
पुणे : पुण्यातील कस्तुरे चौकात महाआरतीसाठी जमलेल्या मनसे कार्यकर्त्यांना (MNS activists) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कस्तुरे चौकातील बंदिवान मारुती मंदिरात (Bandiwan maruti mandir) ही महाआरती करण्यासाठी मनसे कार्यकर्ते जमले होते. शहरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे गनिमी कावा करत कार्यकर्ते मंदिरात दाखल झाले. पण पोलिसांना ही खबर लागताच त्यांना ताब्यात घेण्यात आले. याठिकाणी मनसे कार्यकर्ते पोलिसांची नजर चुकवून आले आणि मंदिरात पोहोचताच महाआरती करायला लागले. त्यावेळी तेथे पोलीस (Police) दाखल झाले. मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेण्यात आले. महाआरती करण्यास कोणाचाही विरोध नाही. मात्र सध्या कायदा सुव्यवस्था राखण्याच्या हेतून मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सकाळी खालकर चौकात केली होती आरती
पुण्यातील खालकर चौकात मनसेतर्फे सकाळी महाआरती करण्यात आली होती. मनसे नेते अजय शिंदे यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या आरतीनंतर पुण्येश्वर मंदिरात मनसेतर्फे महाआरती करण्यात येणार होती, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. विश्रामबाग पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. पुण्येश्वर मंदिराशेजारीच मशीद आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आता कस्तुरे चौकातूनही मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
काय म्हणाले पोलीस आयुक्त?
कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर काही मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मनसेच्या मुद्द्यावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले, की महाआरती करण्यास कोणाचीही मनाई नाही. मात्र सर्व गोष्टी कायद्यानुसार व्हायला हव्या, कायदा मोडल्यास कारवाई करणार. अनेक ठिकाणी हनुमान चालिसा लावण्यात आली नाही. कारण मशिदींवरच्या भोंग्यांचा आवाजही आज ऐकायला नाही मिळाला. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत अनेक मशिदींमध्ये आवाजाची मर्यादा राखत अजान झाली. पुण्यातही शांतता पाहायला मिळाली, असे अमिताभ गुप्ता म्हणाले.