MNS Hanuman Chalisa : पुण्याच्या खालकर चौकातल्या हनुमान मंदिराबाहेर भजनाचा कार्यक्रम, संध्याकाळी राज ठाकरे करणार महाआरती
मनसेच्या (MNS) बहुचर्चित हनुमान चालिसा पठण (Hanuman Chalisa) आणि महाआरतीच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) हस्ते हनुमानाची आरती होणार आहे. खालकर चौकातील हनुमान मंदिरात ही आरती होणार आहे.
पुणे : मनसेच्या (MNS) बहुचर्चित हनुमान चालिसा पठण (Hanuman Chalisa) आणि महाआरतीच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) हस्ते हनुमानाची आरती होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता राज ठाकरे सामुदायिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाला लावणार हजेरी लावणार आहेत. खालकर चौकातील हनुमान मंदिरात ही आरती होणार आहे. यानिमित्त मनसेने कुमठेकर रस्त्यावर जोरदार वातावरणनिर्मिती केली आहे. हनुमान मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. दरम्यान, पुण्यातील हनुमान मंदिराबाहेर भजनाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. याठिकाणी मनसे कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली आहे. हनुमानाच्या अभिषेकाला सुरुवात झाली आहे. मंत्रोपच्चारात अभिषेक होत आहे. मनसे नेते अजय शिंदे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास ते हजेरी लावणार असून हनुमान महाआरती करणार आहेत.
कार्यक्रमात प्रथमच सहभाग
राज ठाकरे कालपासून दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यासाठी मनसेने जोरदार तयारी केली आहे. मशिदीवरचे भोंगे काढावे अन्यथा त्यासमोर दुप्पट आवाजाने हनुमान चालिसा लावणार, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती. त्यापार्श्वभूमीवर आज हा कार्यक्रम होत आहे. राज ठाकरे यांनी मांडलेल्या या भूमिकेनंतर प्रथमच ते अशा कार्यक्रमात सहभागी होत आहेत.
पुरंदरेंच्या मुलाची घेणार भेट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे बाबासाहेब पुरंदरेंच्या मुलाची भेट या दौऱ्यात घेणार आहेत. प्रसाद पुरंदरे यांची ते थोड्या वेळात भेट घेणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.
वसंत मोरे सहभागी होणार नाहीत?
आपल्याला निमंत्रण नसल्याने जाणार नसल्याचे वसंत मोरे यांनी याधीच सांगितले आहे. हा कार्यक्रम मनसेचा नसून अजय शिंदे यांचा असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला होता. त्यामुळे ते संध्याकाळी या कार्यक्रमात सहभागी होतात, की नाही, याविषयी उत्सुकता आहे.