Pune Vasant More : ‘तसं नाही तर असं एकत्र आलोच’, गुन्हा दाखल झाल्यानंतर वसंत मोरेंनी साईनाथ बाबरांसोबतचा फोटो केला पोस्ट
आम्ही काही दिवसांपूर्वी कोंढव्यात पाण्यासाठी आंदोलन केले होते. त्यावेळी गुन्हा दाखल झाला होता. आम्हाला आज पोलीस स्टेशनला हजर व्हायला सांगितले होते. त्यानुसार आम्ही येथे आलो आहोत. आम्हाला टेबल जामीन मंजूर झाला आहे, असे साईनाथ बाबर म्हणाले.
पुणे : मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) तसेच शहराध्यक्ष साईनाथ बाबर शिवाजी नगर पोलीस स्टेशनला हजर झाले. पाण्याच्या प्रश्नासंदर्भात वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांनी महानगरपालिकेमध्ये (PMC) आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान या दोघांवर गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी वसंत मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. साईनाथ बाबर यांच्यासोबतचा फोटो त्यांनी पोस्ट केला आहे आणि तसे नाही तर असे तरी एकत्र आलोच, अशी कॅप्शन लिहिली आहे. मनसेच्या (MNS) वतीने 17 मार्च रोजी पाण्याच्या प्रश्नावरून आंदोलन करण्यात आले होते. पुणे महानगरपालिकेच्या आवारात कोणतेही आंदोलन करण्यास मनाई असताना त्यांनी आंदोलन केल्यामुळे तेथील सुरक्षारक्षकाने लेखी तक्रार दिली होती. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
काय म्हणाले वसंत मोरे?
आम्ही पाण्यासाठी आंदोलन केले होते. त्यासाठी आम्ही आज पोलीस स्टेशनला एकत्र आलो. आम्ही एकत्रच आहोत. आमच्यात काही मतभेद आहेत, मनभेद नाहीत, असे स्पष्टीकर वसंत मोरेंनी दिले आहे. साईनाथ बाबर आमच्या तालमीत तयार झाला आहे. साईनाथ बाबर माझे मित्र आहेत आणि राजसाहेब ठाकरे माझे अध्यक्ष आहेत. राज ठाकरेंना भेटणार, असे मोरे म्हणाले. त्यांना भेटायचे होते मात्र त्यांची तब्येत बिघडली. ते पुन्हा शनिवारी आणि रविवारी पुण्यात येणार आहेत. त्यावेळी कदाचित भेट होईल, अशी आशा वसंत मोरेंनी व्यक्त केली. दरम्यान, कार्यालयात जाणार का, या प्रश्नावर मात्र मोरेंनी स्पष्ट बोलणे टाळले. त्यामुळे अजूनही मतभेद आणि दरी कायम असल्याचीच जाणीव त्यांनी यानिमित्ताने करून दिली आहे.
‘आज हजर होण्यास सांगितले होते’
आम्ही काही दिवसांपूर्वी कोंढव्यात पाण्यासाठी आंदोलन केले होते. त्यावेळी गुन्हा दाखल झाला होता. आम्हाला आज पोलीस स्टेशनला हजर व्हायला सांगितले होते. त्यानुसार आम्ही येथे आलो आहोत. आम्हाला टेबल जामीन मंजूर झाला आहे, असे साईनाथ बाबर म्हणाले. तर राज ठाकरे यांच्या सभेसंदर्भात राज ठाकरे स्वत: निर्णय जाहीर करतील. आमची तयारी आहे, असे साईनाथ बाबर म्हणाले.