अवहेलना सुरूच? राज ठाकरे यांच्या कार्यक्रमात वसंत मोरे तासभर उभेच; असं काय घडलं?
कुणीही वसंत मोरे यांना बसायला जागा दिली नाही. त्यामुळे मोरे यांना कार्यक्रम संपेपर्यंत उभंच राहावं लागलं. वसंत मोरे यांना आपल्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बसायला जागा दिली नाही.
पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे वारंवार पुण्यात जाऊन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. काही सल्ले देतानाच सूचनाही करत आहेत. संघटना बांधणीवर जातीने लक्ष घालत आहेत. राज्यातील इतर शहरांपेक्षा पुण्यावर राज ठाकरे यांनी सर्वाधिक लक्ष केंद्रीत केलं आहे. मात्र, असं असतानाही पुणे मनसेत सर्व काही अलबेल आहे असं चित्रं नाहीये. पुणे मनसेत अजूनही धूसफूस सुरू असल्याचं दिसून येतंय. त्यातच मनसेचे नेते वसंत मोरे यांना डावलण्यात येत असल्याच्या बातम्याही त्याला खतपाणी घालत असतात. कालही वसंत मोरे यांना राज ठाकरे यांच्या कार्यक्रमात तासभर तिष्ठत उभं राहावं लागल्याचं उघड झालं. विशेष म्हणजे इतर पदाधिकारी बसलेले असताना वसंत मोरे यांच्या सारख्या सीनियर नेत्याला उभं राहावं लागल्याने मनसेत मोरे यांची अवहेलना सुरूच असल्याची चर्चा रंगली आहे.
प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्ताने पुण्यात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राज ठाकरे उपस्थित होते. राज ठाकरे या कार्यक्रमातील प्रमुख वक्ते असल्याने मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला मोठ्याप्रमाणावर हजेरी लावली. वसंत मोरेही आपल्या नेत्याचं भाषण ऐकण्यासाठी या कार्यक्रमाला आले होते.
वसंत मोरे यांना कार्यक्रमात हॉलमध्ये बसायला जागा मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी उभ्यानेच कार्यक्रम पाहिला. तासभर वसंत मोरे उभ्याने कार्यक्रम पाहात होते. विशेष म्हणजे वसंत मोरे जिथे उभे होते, त्या पहिल्या रांगेत मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बसलेले होते. आपल्या बाजूला पक्षाचा सीनियर नेता उभा आहे, हे माहीत असूनही एकही पदाधिकारी उठून उभा राहिला नाही.
कुणीही वसंत मोरे यांना बसायला जागा दिली नाही. त्यामुळे मोरे यांना कार्यक्रम संपेपर्यंत उभंच राहावं लागलं. वसंत मोरे यांना आपल्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बसायला जागा दिली नाही. यावरून पक्षात मोरे यांची अजूनही अवहेलना सुरू असल्याची चर्चा पुण्याच्या राजकारणात रंगली आहे.
दरम्यान, मोरे यांनी काल दुपारीच राज ठाकरे यांची भेट घेतली होती. पुण्यातील राज यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना एका कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होतं. मतीमंद मुलांसाठी सुरू होत असलेल्या कात्रज ते गोखले नगर या बस सेवेचं राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन व्हावं म्हणून निमंत्रण देण्यासाठी मोरे आले होते.
त्यामुळे वसंत मोरे यांच्या पक्षातील नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. त्यानंतर संध्याकाळी हा प्रकार उघडकीस आल्याने आता नवीच चर्चा सुरू झाली आहे.